Ranapati Shivaray Swari Agra: मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpaal Lanjekar)गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे ते त्यांच्या रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटामुळे. मनसे नेते अमेय खोपकर आणि दिग्पाल लांजेकर यांच्या आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेवरून झालेल्या वादानंतर रणपती शिवराय स्वारी आग्रा (Ranapati Shivaray Swari Agra) या चित्रपटाची तारीख बदलली आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती . लवकरच हा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातील कलाकारांबद्दल आता चर्चा होताना दिसतेय. 'शिवराज अष्टक' मालिकेतील हा सहावा चित्रपट इतिहासातील अत्यंत थरारक आणि महत्त्वाच्या आग्रा सुटकेवर आधारित आहे. औरंगजेबाच्या दरबारात महाराजांनी दाखवलेला बाणा, आणि नंतर येणारा सुटकेचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
मिर्झा राजे जयसिंग यांच्या भूमिकेत कोण?
या भव्य चित्रपटात अनेक लोकप्रिय व नामांकित कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. मृणाल कुलकर्णी, अभिजीत श्वेतचंद्र ,समीर धर्माधिकारी, अजय पुरकर, विराजस कुलकर्णी आणि स्मिता शेवाळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दरम्यान एक बॉलीवूड अभिनेता ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या या अभिनेत्याविषयीची चर्चा रंगली आहे.
महाभारत मालिकेतील दुर्योधनासह अनेक गाजलेल्या भूमिकांमुळे ओळखला जाणारा अभिनेता पुनीत इस्सर हा अभिनेता मिर्झाराजे जयसिंग या प्रभावशाली भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेची पहिली झलक समोर आली असून मिर्झाराजे जयसिंग यांच्या भारदस्त भूमिकेबद्दल चर्चा सुरू आहे. पुनीतच्या या भूमिकेमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर समोर आला होता. औरंगजेबाच्या दरबारातील दृश्य आणि शिवरायांचा बाणा पाहून या चित्रपटात काय बघायला मिळणार? याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
काय आहे चित्रपटाचे कथानक?
रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेचा थरार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. औरंगजेबाच्या दरबारात लहानग्या संभाजी महाराजांचा हात धरून गेलेल्या छत्रपती शिवरायांची गर्जना साऱ्यांच्या काळजाचा ठाव घेणारी आहे. प्रतापगडावरचा सिंह आगऱ्यात जातो तेंव्हा होतं याचा थरारक अनुभव देणारा हा चित्रपट 6 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट आधी 30 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.