Dhurandhar movie Ranveer Singh new first look teaser video : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नव्या सिनेमाचं नाव, पहिला लूक आणि एक झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. या नव्या चित्रपटाचं नाव आहे ‘धुरंधर’. हा चित्रपट जिओ स्टुडिओज आणि बी62 स्टुडिओज यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. रणवीरच्या वाढदिवशी 2025 मधील सर्वात मोठा आणि अत्यंत अपेक्षित असलेला हा एक्शन-थ्रिलर चित्रपट "धुरंधर" याचा टीझर निर्मात्यांनी शेअर केलाय. 

5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार ‘धुरंधर’

‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर यांनी केले आहे. चित्रपटाच्या पहिल्या झलक टीझर व्हिडिओमध्ये रणवीर सिंगसोबत संजय दत्त आणि अक्षय खन्ना यांचाही दमदार लूक दिसून येतो. या चित्रपटात आर. माधवन आणि अर्जुन रामपाल हे प्रतिभावान अभिनेते देखील आहेत.

रणवीर सिंगचा लूक अंगावर शहारे आणणारा

‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंगचा आतापर्यंतचा सर्वात भीतीदायक आणि जबरदस्त लूक पाहायला मिळतो. हा लूक पाहून तुम्हाला "एनिमल" किंवा "खिलजी" हे त्याचे आधीचे लूकसुद्धा फिके वाटतील. टीझरमध्ये रणवीर सिंग एका डायलॉगमध्ये म्हणतो – "आता बिघडवायची वेळ आली आहे." तर दुसऱ्या एका जबरदस्त डायलॉगमध्ये तो म्हणतो – "घायल आहे म्हणून अधिक घातक आहे."

फर्स्ट लूक पण थेट ट्रेलरसारखा

2 मिनिटं 40 सेकंदांचा हा फर्स्ट लूक टीझर अतिशय रॉ, इंटेन्स आणि ऍक्शनने भरलेला आहे. यामध्ये प्रचंड थरार, दमदार संवाद आणि धडाकेबाज अ‍ॅक्शन आहे. या टीझरमधील संगीतदेखील लक्षणीय आहे. म्युझिकबाबत बोलायचं झालं तर गायिका जैस्मिन सैंडलस यांचा आवाज ऐकायला मिळतो. विशेष म्हणजे, या गाण्यात न्यू-एज आर्टिस्ट लोकांचं कोलॅबोरेशन आहे.

‘उरी’च्या दिग्दर्शकाची रणवीर सिंगसोबत नवी फिल्म

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि बी62 स्टुडिओ प्रोडक्शनचा हा “धुरंधर” चित्रपट आदित्य धर यांनी लिहिलेला, दिग्दर्शित केलेला आणि निर्मितीदेखील त्यांनीच केली आहे. याचे सह-निर्माते ज्योती देशपांडे आणि लोकेश धर आहेत. ही फिल्म अशा अज्ञात पुरुषांच्या कहाण्यांवर आधारित आहे, ज्या आजवर लोकांसमोर कधी आल्या नव्हत्या – आणि जे अद्यापही एक रहस्यच आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

एका कलाकाराचा अपघाती मृत्यू, 18 लाखांचं आर्थिक नुकसान; 'पंढरीची वारी' सिनेमाच्या शूटिंगवेळी काय घडलं होतं?