Ayesha Khan: बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या कुठल्या ना कुठल्या अभिनेत्रीला कधी ना कधी एखादा वाईट अनुभव आलेला असतो. ‘धुरंधर’ फेम अभिनेत्री ( Dhurandhar Fame Actress) आयशा खानने अलीकडेच ग्लॅमर विश्वातील कटू वास्तवावर भाष्य करत धक्कादायक खुलासे केले आहेत. ऑनलाइन ट्रोलिंग, बलात्काराच्या धमक्या आणि प्रत्यक्ष आयुष्यात झालेल्या भयावह अनुभवांबाबत आयशाने मनमोकळेपणाने सांगितले. 'शरारत” गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मासिक पाळी सुरू असल्याची प्रामाणिक कबुली तिने दिलेली. तेव्हा बराच त्रास सहन करावं लागल्याचंही तिने सांगितलं होतं. या कबुलीनंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागल्याचेही तिने सांगितलं. (Ayesha khan)

Continues below advertisement

सतत ट्रोलिंगचा सामना

‘धुरंधर’मधील ‘शरारत’ गाण्याच्या शूटिंगदरम्यान स्वतःला पिरियड्स सुरू असल्याचं सांगितल्यावरही तिला ट्रोल करण्यात आलं, असं आयशाने सांगितलं. “मी साधा टॉप घातला किंवा स्कर्ट, लोकांना प्रत्येक गोष्टीत अडचण असते. काहीही पोस्ट करण्यापूर्वी मला शंभर वेळा विचार करावा लागतो. इतरांच्या घाणेरड्या विचारांमुळे मला माझ्या आवडींवर बंधनं घालावी लागतात, हे दु:खद आहे,” असं ती म्हणाली.

Continues below advertisement

दररोज येतात बलात्काराच्या धमक्या

‘मोजो स्टोरी’ला दिलेल्या मुलाखतीत आयशाने कबूल केलं की तिला दररोज बलात्काराच्या धमक्या येतात. “आत्ता फोन उघडून दाखवू शकते. दुर्दैवाची बाब म्हणजे आता अशा धमक्या देणं सामान्य झालं आहे. लोक चर्चा करतात, प्रश्न विचारतात, पण ठोस कारवाई होत नाही,” अशी खंत तिने व्यक्त केली.

‘तो फक्त ऑनलाइन ट्रोल नाही...’

या धमक्यांमुळे तिला भीती वाटते, असं सांगताना आयशा म्हणाली, “हे ट्रोल करणारे लोक रोबोट नाहीत, ते आपल्या आसपासच राहणारे माणसं आहेत. त्यांच्याकडे ताकद असती तर ते फक्त लिहून थांबले नसते.”

रेप करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा

आयशाने तिच्या आयुष्यातील एक अतिशय वेदनादायक प्रसंगही शेअर केला. तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाल्याचं तिने सांगितलं. त्या घटनेची आठवण काढताना ती भावूक झाली. “ऑनलाइन येणाऱ्या कमेंट्स जुन्या जखमा पुन्हा उघडतात. कधी कधी वाटतं, मी प्रसिद्ध नसते तर अशी घटना पुन्हा घडली असती,” असं ती म्हणाली.

सेटवरील धक्कादायक प्रकार

एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला इंस्टाग्रामवर दररोज अश्लील व्हॉइस नोट्स आणि मेसेज येत होते. धक्कादायक बाब म्हणजे हे मेसेज पाठवणारा अनोळखी नव्हता, तर सेटवर काम करणारा एक स्पॉट बॉयच होता. आयशाने तात्काळ ही बाब प्रोडक्शन टीम आणि तिच्या वडिलांना सांगितली. त्यानंतर संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. आयशा खानच्या या खुलाशांमुळे मनोरंजन विश्वातील कलाकारांना सहन कराव्या लागणाऱ्या मानसिक छळाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.