Ambarnath:अंबरनाथ शहरात ‘धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर’चं भव्य उद्घाटन मोठ्या जल्लोषात पार पडलं. या उद्घाटन सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते महेश कोठारे आणि अशोक सराफ यांची विशेष उपस्थिती होती. या सोहळ्यादरम्यान दोन्ही कलाकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्याचं भरभरून कौतुक केलं.
महेश कोठारे यांचे कौतुकाचे उद्गार
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता महेश कोठारे यांनी आपल्या भाषणात म्हटलं, “धडाकेबाज आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि झपाटलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथकरांना खरोखरच रत्न दिलं आहे. या शहराला नाट्यकलेचं भव्य स्थान दिलंय, त्याबद्दल आम्ही सर्व कलाकार मनापासून खुश आहोत.”
ते पुढे म्हणाले, “मी अमेरिकेला गेलो असताना ‘टाईम्स स्क्वेअर’ परिसरातील ‘लिरिक्स थेटर’मध्ये ‘हॅरी पॉटर’चा शो पाहिला. तिथल्या नाट्यगृहात त्यांच्या कलाकारांची तैलचित्रं लावलेली होती. तसंच काहीसं दृश्य येथे पाहून मला खूप आनंद झाला. कलाकाराला असं स्थान दिलं, ही मोठी गोष्ट आहे. शिंदे साहेब जे काही करतात, ते धडाकेबाजच करतात, अशी उद्घाटन समारंभ मी याआधी कधीच पाहिली नव्हती. तुम्हाला आणि तुमच्या टीमला मनःपूर्वक शुभेच्छा.”
हे नाट्यमंदिर म्हणजे या शहराची शान:अशोक सराफ
मराठी रंगभूमीचे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या खास शैलीत सभेला संबोधित करताना सांगितलं, “अंबरनाथचं हे नाट्यमंदिर म्हणजे या शहराची शान आहे. जसं तुम्हाला शिवमंदिराबद्दल आदर आहे, तसाच या नाट्यमंदिराबद्दलही आदर ठेवावा. इतकं भव्य नाट्यमंदिर महाराष्ट्रात दुर्मिळ आहे.” ते पुढे म्हणाले, “इतर ठिकाणी नाट्यगृहांबाबत स्वच्छतेची समस्या कायम असते, पण मला खात्री आहे की अंबरनाथचे सुसंस्कृत आणि कलाप्रेमी नागरिक हे नाट्यमंदिर स्वच्छ ठेवतील. हे आपलं घर आहे, त्याची काळजी आपणच घ्यायची.”
अशोक सराफ यांनी मराठी भाषेतील अनुस्वार या लहानशा घटकाचं महत्त्वही विनोदी पद्धतीने सांगितलं. ते म्हणाले, “अनुस्वार हा जणू गंधासारखा आहे. नीट दिला नाही, तर शब्दाचा अर्थच बदलतो. ‘रग’ वर अनुस्वार दिला की ‘रंग’ होतो!” शेवटी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानत म्हटलं, “शिंदे साहेब मला प्रत्येक वेळी सन्मान देतात, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.”
या सोहळ्याला अनेक मान्यवर, कलावंत आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर’ हे अंबरनाथच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारं ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.