Dharmaveer 2  Movie Updates :  काही दिवसांपूर्वीच बहुप्रतिक्षीत आणि चर्चेत असलेल्या ''धर्मवीर-2''(Dharmaveer 2) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. "धर्मवीर -2" च्या ट्रेलरला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळाला आहे. काही दिवसांमध्येच या चित्रपटाने दीड कोटींहून अधिक व्यूजचा आकडा ओलांडला. आता, बाजारात या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांवर अंदाज सुरू झाले आहे. ट्रेड बाजारात हा चित्रपट 100 कोटींचा आकडा गाठणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. "धर्मवीर -2" हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. 


बहुप्रतीक्षित अशा "धर्मवीर-2" या चित्रपटाचा ट्रेलर एका रंगारंग सोहळ्यात नुकताच लाँच करण्यात आला. 'आपल्या संघटनेचा माज आहे तो भगवा रंग ' या वाक्यापासून सुरू होणारा ट्रेलर 'एक दाढीवाला दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला' अशा दमदार, लक्षवेधी संवादांमुळे अल्पावधीतच लोकांमध्ये व्हायरल झाला. आतापर्यंत तब्बल 1 कोटीपेक्षाही अधिक व्ह्यूज या ट्रेलरला मिळाले आहेत. साहील मोशन आर्ट्सचे मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी "धर्मवीर - 2" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी पार पाडली आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. आता ट्रेलर लाँच झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढल्याचे चित्र आहे.


बाजारात ''धर्मवीर-2'' ची रंगलीय चर्चा...


"धर्मवीर-2" या चित्रपटाची चर्चा आता ट्रेड बाजारासोबत, सट्टा बाजारातही सुरू झाली आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच चित्रपटाच्या कमाईवर सट्टा लागत असल्याची चर्चा आहे.  गेल्या काही वर्षांत बऱ्याच चित्रपटांनी व्यावसायिक यश मिळवलं. ''धर्मवीर-'' चित्रपटाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. या चित्रपटाने 50 कोटींची कमाई केल्याची चर्चा होती. त्यानंतर आता,  "धर्मवीर-2" हा चित्रपट 100 कोटी कमावणार  असल्याची चर्चा चित्रपटसृष्टीत आणि बाजारात रंगली आहे. प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. "धर्मवीर" मुक्काम पोस्ट ठाणे या पहिल्या भागाला चांगला प्रतिसाद मिळाला. 'धर्मवीर'च्या पहिल्या भागाच्या यशानंतर आता "धर्मवीर -2"च्या बॉक्स ऑफिसवरील कमाईकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


ट्रेलरमध्ये काय?


दरम्यान या ट्रेलरमध्ये काही संवादांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचं कारण, आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला असे अनेक प्रश्न उपस्थित करणारे संवाद यामध्ये आहेत. आनंद दिघे हे म्हणतात की,कुणाशीतरी आघाडी करुन तुम्ही विकलात तो भगवा रंग. हा संवाद सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या क्षितिज दातेच्याही एका संवादाने लक्ष वेधून घेतलं आहे, 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करुन गेला आहे.