Deool Band 2 Box Office Collection: यंदाचं वर्ष मराठी मनोरंजन सृष्टीसाठी अगदी खास म्हणायला हवं. वर्षाच्या सुरुवातीलाच 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटाच्या कमाईमुळे मराठी चित्रपटांची सुरुवात धमाकेदार झाली. नंतर येणारे जवळपास सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) चांगले चालले. 'राजा शिवाजी' चित्रपटाने सर्वाधिक कमावणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं. महाराष्ट्रभरात या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद आणि कौतुक मिळाल्यानंतर प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) चित्रपटाने मराठी मनोरंजनसृष्टीत नवा विक्रम रचलाय. या चित्रपटाने रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' चित्रपटाचा 100 कोटींचा विक्रम मोडीत काढलाय. गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट 'राजा शिवाजी' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू शकेल का? यावरून चर्चा सुरू होत्या. अखेर तो दिवस आलाच . 'देऊळ बंद 2 ' चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. या संदर्भात दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे यांची पोस्ट सध्या चर्चेत आहे.

Continues below advertisement

आतापर्यंत बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?

देऊळ बंद 2 चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हाउसफुल ठरत आहे. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 91.50 कोटी रुपयांचा गल्ला केला. इतर देशांमध्ये 6.55 कोटी रुपये, तंबू शोमध्ये 2.45 कोटी रुपये या चित्रपटाने कमावले. त्यामुळे या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 100 कोटींच्या वर गेलं आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शन विषयी माहिती देणारी एक पोस्ट दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून केली आहे. सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचे आणि स्वामी भक्तांचे आभार असं म्हणत प्रवीण तरडे यांनी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत. घटना मोठी ..शंभर कोटी ..आम्ही तुमचे आभारी आहोत ..असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिला आहे.

 

Continues below advertisement

19 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2.89 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. नंतर हे कलेक्शन वाढत गेलं. पहिल्या आठवड्यातचित्रपटाने 30.20 कोटी रुपयांचा गल्ला केला.मजल दरमजल करत हा चित्रपट प्रदर्शनाच्या सहाव्या आठवड्यात येऊन पोहोचला आहे. सहाव्या आठवड्यानंतरही या चित्रपटाची क्रेझ महाराष्ट्रभर कायम असून परदेशातही हा चित्रपट पाहायला आवर्जून लोक जाताना दिसत आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्या काही दिवसांमधील कमाई ही कमी असली तरी आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील कलेक्शन मध्ये मोठी झेप घेतली होती. अजूनही अनेक ठिकाणी या चित्रपटाला पसंती मिळत आहे. त्यामुळे भक्तीपर चित्रपटही बॉक्स ऑफिसवर पहिल्या क्रमांकापर्यंत जाऊ शकतो हे 'देऊळ बंद 2'चित्रपटाने सिद्ध केले आहे.