Deepjyoti Marathi Serial: दीपज्योती या मालिकेत सध्या नाट्यमय घडामोडींना वेग आला असून, अभिनेत्री मानसी सुभाष साकारत असलेली ‘प्रीती’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. सकारात्मकतेतून खलनायिकेकडे झुकणारा तिचा प्रवास हा कथानकाचा महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरत आहे. या भूमिकेबद्दल आणि तिच्या अभिनयप्रवासाबद्दल तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या.
सकारात्मक ते खलनायिका; प्रीतीचा वेगळा प्रवास
मानसी सुभाषने साकारलेली प्रीती ही ज्योती आणि कीर्तीची मोठी बहीण तर अभिजीतची लाडकी बहीण आहे. सुरुवातीला प्रेमळ, स्पष्टवक्ती आणि कुटुंबाची काळजी घेणारी अशी तिची प्रतिमा दिसते. मात्र, कथानक पुढे सरकत असताना तिच्या आयुष्यात मोठे धक्के बसतात. तिच्या लाडक्या भावाचा आणि होणाऱ्या नवऱ्याचा अपघात झाल्यानंतर ती मानसिकदृष्ट्या ढासळते आणि हळूहळू खलनायिकेच्या छटेत दिसू लागते.
““मी प्रीती ही भूमिका साकारत आहे. ती ज्योती आणि कीर्तीची मोठी बहीण आणि अभिजीतची लहान बहीण आहे. प्रीती खूप प्रोटेक्टिव्ह आणि पजेसिव्ह स्वभावाची आहे, विशेषतः तिच्या भावाबाबत. तिचे ठाम मत आहे की तिच्या दादाला कोणताही त्रास होऊ नये आणि त्याला राग येईल असे काहीही घडू नये. तिचा आणि तिच्या दादाचा खूप सुंदर बॉण्ड आहे. मालिकेच्या सुरुवातीला ती रोखठोक, प्रेमळ आणि सगळ्यांची काळजी घेणारी मुलगी म्हणून दिसते. पण जसजशी मालिका पुढे जाते, तसतशी तिच्या लाडक्या भावाचा आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा अपघात होतो. या परिस्थितीच्या दबावामुळे ती हळूहळू खलनायिकेच्या छटेत दिसू लागते." असं ती म्हणाली.
ती पुढे म्हणाली, "मला ऑडिशनसाठी कॉल आला होता. तेव्हा मला खूप आनंद झाला. मुळात मी प्रीतीच्या भूमिकेसाठी आले होते, पण ज्योतीच्या कॅरेक्टरसाठीही मी अनेक ऑडिशन्स दिल्या होत्या. नंतर मला कळवण्यात आले की माझी निवड प्रीतीच्या भूमिकेसाठी झाली आहे, जी ज्योतीची मोठी बहीण आहे. सुरुवातीला सकारात्मक असलेली मुलगी नंतर खलनायिकेकडे झुकते हा प्रवास साकारताना मला खूप मजा येईल, असे मला वाटते. सुरुवातीला थोडी भीती वाटली होती, पण नंतर लक्षात आले की ही व्यक्तिरेखा परिस्थितीनुसार बदलणारी आहे, त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. तयारी म्हणून मी खूप लहानसहान गोष्टींवर काम करत आहे. प्रेक्षकांना मी खलनायिका वाटली पाहिजे, यासाठी मी विशेष प्रयत्न करत आहे. उदाहरणार्थ, तिला कोणत्या गोष्टींवर राग येतो, ती कशी प्रतिक्रिया देते, अचानक वाईट वाटल्यावर ती कशी वागते आणि रागानंतर कशी शांत होते यावर मी सातत्याने सराव करत आहे. मी माझ्या व्यक्तिरेखेची बॅकस्टोरी समजून घेते आणि तिच्या अॅक्शन-रिअॅक्शनचा सखोल विचार करते. " असं मानसी सुभाष म्हणाली.
सेटवरची मैत्री; ऑफस्क्रीनही तितकीच घट्ट
मालिकेतील सहकलाकारांबद्दल बोलताना मानसी म्हणाली, “ज्योती, कीर्ती, अभिजीत आणि मी आम्ही सगळे खूप वेळ एकत्र घालवतो. आमची तिघींची खास गट्टी जमली आहे. कॅमेऱ्यासमोरच नव्हे, तर कॅमेऱ्यामागेही आमची मैत्री तितकीच घट्ट आहे.” ती पुढे म्हणाली, “आमच्यातील कोणी एक नसली, तर सेटवर रिकामेपणा जाणवतो. एकदा कीर्ती शूटला नव्हती, तेव्हा आम्हाला खूप वेगळं वाटलं. जणू काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं.”
लहानपणापासून अभिनयाची आवड
मानसीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शाळा आणि कॉलेजमध्ये नाटकांमध्ये सहभाग घेत तिने आपली कला जोपासली. नृत्याचीही तिला आवड असून, घरच्यांकडून तिला “हिरोईन” अशी हाक मारली जायची.दरम्यान, प्रेक्षकांनी दीपज्योती ही मालिका दररोज रात्री ८ वाजता झी मराठीवर पाहायला विसरू नये.
