VIP Treatment in Jail For Accused Actor : हत्या प्रकरणात तुरुंगात असलेला कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा याची चांगलीच बडदास्त ठेवली जात असल्याचे समोर आले आहे. तुरुंगात व्हिआयपी ट्रिटेमेंट घेणाऱ्या दर्शनचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. दर्शनला सध्या सध्या बेंगळुरुतील परप्पना अग्रहारा सेंट्रल जेलमध्ये हत्या प्रकरणात ठेवण्यात आले आहे. 


दर्शनचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तुरुंग अधिकाऱ्यांना प्रशासनाने बोलावणं धाडलं आहे. व्हायरल फोटोमध्ये दर्शन हा कुख्यात गुन्हेगार विल्सन गार्डनर नागासोबत दिसत आहे. 


तुरुंगात सिगारेट ओढताना दिसलाय दर्शन


व्हायरल झालेल्या फोटोमध्ये कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा कारागृहाच्या आत गार्डनसारख्या दिसणाऱ्या जागेत बसलेला दिसत आहे. या फोटोत त्याच्या एका हातात ड्रिंक आणि दुसऱ्या हातात सिगारेट आहे. त्याच्याभोवती काही कैदीही बसलेले दिसत आहेच. या फोटोत त्याच्यासोबत काळ्या शर्टमध्ये कुख्यात गुन्हेगार विल्सन गार्डन नागा देखील दिसत आहे.


चाहत्याच्या हत्या प्रकरणी  अटकेत आहे दर्शन...


 अभिनेता दर्शन थुगुडेपा याला त्याचा चाहता रेणुकास्वामीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. 9 जून रोजी बेंगळुरूमधील उड्डाणपुलाजवळ 33 वर्षीय ऑटोचालक रेणुकास्वामी यांचा मृतदेह सापडला होता. याबाबत पोलिसांनी सांगितले होते की, 'मृत रेणुकास्वामी हा दर्शनाचा मोठा चाहता होता. त्याने सोशल मीडियावर अभिनेत्री पवित्रा गौडा यांना आक्षेपार्ह मेसेज पाठवले होते. यानंतर दर्शनच्या सांगण्यावरून एका टोळक्याने त्याचे अपहरण करून त्याची हत्या केली. पवित्रा ही दर्शनाची प्रेयसी असल्याची चर्चा होती. हत्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी दर्शन आणि पवित्र गौडा यांच्यासह 15 जणांना अटक केली.


7  तुरुंग अधिकारी निलंबित...


कर्नाटक सरकारने या प्रकरणाचा तपास पोलिसांकडे सोपवला होता. यानंतर बेंगळुरू येथील परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहातील 7 तुरुंग अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.


सखोल चौकशीची मागणी....


रेणुकास्वामी यांचे वडील काशिनाथ एस शिवनगौद्रू यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा करण्याची मागणी केली आहे. "अशा गोष्टींमुळे सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी भावना निर्माण झाली आहे," ते म्हणाले, "फोटो पाहून मला आश्चर्य वाटले की तो (दर्शन) इतरांसोबत सिगारेट घेऊन चहा पितोय. तो तुरुंगात आहे की नाही? तो तुरुंग असावा आणि त्याला इतर सामान्य कैद्यांसारखे वागवले पाहिजे, परंतु येथे तो एखाद्या रिसॉर्टमध्ये बसलेला दिसत असल्याचे त्यांनी म्हटले.