Dalljiet Kaur Birthday:मनोरंजनविश्वात अभिनेत्रीचं लग्न झालं किंवा तिला बाळ झालं की करियर संपतं असं सर्रास बोललं जातं. पण आता हा समज आता हळूहळू निघून गेलेला पहायला मिळतो. आज बॉलिवूडमध्ये अशा कितीतरी अभिनेत्री आपली प्रेग्नंसी, वजन, दिसणं हे बिनधास्त मिरवताना दिसतात. पण टीव्ही विश्वातल्या एका आघाडीच्या अभिनेत्रीला याबाबतीत फार संघर्ष करावा लागला आहे. 'इस प्यार को क्या नाम दूं', 'कयामत की रात', 'गुड्डन तुमसे ना हो पाएगा' आणि 'काला टीका' यांसारख्या लोकप्रिय मालिकांत दमदार भूमिका साकारलेल्या या अभिनेत्रीला वजनामुळं खूप ट्रोल करण्यात आलं होतं. आई झाल्यानंतर तिच्या कामाला ब्रेक लागला. पण यावर मात करत अवघ्या सहा महिन्यात तिनं तब्बल 36 किलो वजन कमी करून बॅक किक मारल्याचं दिसलं.
आई झाल्यानंतर करिअरमध्ये ब्रेक लागला. काम मिळवण्यासाठी धडपड, आर्थिक संकटांचा सामना, आणि नकाराचा वारंवार सामना करणाऱ्या दलजीतने हार मानली नाही. 'काला टीका'मधील भूमिकेने तिच्या आयुष्याला नवी दिशा दिली. आज दलजीत कौरचा वाढदिवस आहे.
मुलाचा जन्म झाला अन करियरमध्ये अडथळे झाले सुरु
दलजीत कौरनं मुलाला जन्म दिल्यानंतर करियर एकदम शुन्यावर आलं. जेंव्हा दलजीतनं तिच्या मुलाला जन्म दिला तेंव्हा तिला काम मिळणं जवळपास बंद झालं होतं. एका मुलाखतीत तिनं सविस्तर याविषयी सांगितलं होतं. प्रेग्नंसीपूर्वी 'इस प्यार को क्या नाम दूं'मध्ये मी अंजलीची भूमिका करत होते, जी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पण प्रेग्नंसीमध्ये वाढलेलं वजन अवघ्या सहा महिन्यात घटवत ती परत इंडस्टीत आली तेंव्हा येणाऱ्या भूमिका अचानक १० वर्षांनी मोठ्या स्त्रीयांच्या येऊ लागल्या. शेवटच्या दीड वर्षात असं काय केलं की माझ्यावर 20 वर्षांनी मोठ्या भूमिका येऊ लागल्या? मी 10 वर्षांनी जुनी वाटत नाही, मग हा बदल का? मी वर्कआउट करून वजन कमी केलंय, माझं दिसणंही वेगळं आहे, मग ही वागणूक का? असा सवालही तिनं केला होता.
वजन घटवलं अन् पुन्हा मारली एन्ट्री
एकता कपूर यांनी 'कयामत की रात'साठी करुणाची निगेटिव्ह भूमिका दिली, तेव्हा गोष्टी बदलल्या. "ही माझी पहिली निगेटिव्ह भूमिका होती. याआधी मी 'काला टीका' केलं होतं, आणि त्यानंतर हा शो आला. 30 वर्षांचा गॅप दाखवणारी भूमिका होती, पण ती मला नव्या उंचीवर घेऊन गेली असंही दलजीतनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. मुल जन्मल्यानंतर दलजीतनं वजन घटवत, संघर्ष करत आपली नवी वाट शोधली.