Crime Thriller Movie: एखाद्या मर्डर मिस्ट्रीमध्ये शेवटपर्यंत ‘खून नेमका कोणी केला?’ याचा थांगपत्ता लागत नाही, तेव्हाच ती कथा खऱ्या अर्थाने रंजक ठरते. सध्या अशीच एक थरारक आणि गुंतागुंतीची रहस्यमय गोष्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतेय. ZEE5 वर प्रदर्शित झालेली फिल्मही अशाच थरार, संशय आणि अनेक व्यक्तिरेखांनी विणलेल्या कथेमुळे प्रेक्षकांना गुंतवून ठेवते. एव्हरीबडी लव्हज सोहराब हांडा (Everybody Loves Sohrab Handa) ही फिल्म सध्या OTT वर धुमाकूळ घालतेय.
काय आहे कथानक?
कथा एका सुंदर हिल स्टेशनवरील आलिशान व्हिलामध्ये सुरू होते. रमन (नील भूपलम) आणि जयती (पालोमी घोष) त्यांच्या लग्नाच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त खास सेलिब्रेशनसाठी येथे आलेले असतात. या आनंदात सहभागी होण्यासाठी त्यांनी आपल्या मित्रमंडळींना आणि जवळच्या लोकांना आमंत्रित केलं असतं. त्यात त्यांचा बिझनेस पार्टनर सोहराब (विनय पाठक), त्याचा भाऊ (चंद्रचूड राय) आणि पत्नी इशा (कोयल पुरी) यांचाही समावेश असतो.
पण या सगळ्या आनंदी वातावरणात एक व्यक्ती मात्र सगळ्यांपासून वेगळी ठरते.सोहराब. त्याचा चिडखोर आणि आक्रमक स्वभाव प्रत्येकाला त्रास देतो. तो प्रत्येकाशी वाद घालतो, अपमान करतो.त्याचा गर्विष्ठ स्वभाव अनेकांना खटकतो. आणि मग एका रात्री अचानक त्याचा खून होतो. या घटनेनंतर पोलीस इन्स्पेक्टर अफजल कुरेशी (सौरभ शुक्ला) तपासासाठी येतो. पण धक्कादायक बाब म्हणजे, त्या घरात उपस्थित असलेल्या प्रत्येकाकडे सोहराबचा खून करण्यामागचं कारण असतं. मग खरा खुनी कोण? असा प्रश्न सगळ्यांनाच लटकवून ठेवतो.
क्लायमॅक्स हादरवून सोडणार
दिग्दर्शक रजत कपूर यांनी या कथेला पारंपरिक मर्डर मिस्ट्रीपासून वेगळी ट्रीटमेंट दिली आहे. एका घरात घडणारा खून हा विषय नवीन नसला, तरी त्या घरातील प्रत्येकाच्या आयुष्याच्या स्तरांना उलगडत कथा पुढे नेण्याची शैली वेगळी आणि आकर्षक वाटणारी आहे . ही केवळ खुनाची कथा नाही, तर भावनांचा गुंता आहे. राग, अहंकार, मत्सर, आनंद, दुःख, बालपणीचे आघात, नात्यांमधील तडे अशा अनेक भावनांना या एका कथेत जागा मिळालीय. कथा सतत वर्तमान आणि भूतकाळात फिरत राहते. शेवटी जेव्हा खरा खुनी आणि खुनामागचं कारण समोर येतं, तेव्हा प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसतो.
अभिनय ठरतो जमेची बाजू
अभिनयाच्या बाबतीत सोहराबच्या भूमिकेत विनय पाठक अक्षरशः उठून दिसतात. त्यांचा राग, चिडचिड, अस्वस्थता सगळं अगदी नैसर्गिक वाटतं. रजत कपूर त्यांच्या भूमिकेतून कथेला जरा स्थैर्य देतात. रणवीर शोरे यांचा कमी वेळेत अधिक प्रभाव जाणवतो. कोयल पुरी, नील भूपलम आणि पालोमी घोष आपल्या भूमिकांमध्ये खऱ्या वाटणाऱ्या भूमिका तर चंद्रचूड राय त्यांच्या अभिनयामुळे विशेष लक्ष वेधून घेतात. सध्या हा सिनेमा ओटीटीवर प्रेक्षकांची पसंती मिळवत ट्रेंड करताना दिसत आहे.
