Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
या संपूर्ण महानाट्यात स्वामींची न्यायपरीक्षा आणि चातुर्मास कथांमधून तुळजाईची दैवी शिकवण ही प्रेक्षकांसाठी, मनोरंजनाचा आणि भक्तीचा एक अद्भुत सोहळा घेऊन येत आहे..

Colors Marathi Serial: ऑगस्ट महिना कलर्स मराठीच्या प्रेक्षकांसाठी अत्यंत खास आणि आध्यात्माची अनोखी अनुभूती देणारा ठरणार आहे, कारण या महिन्यात "महिना स्वातंत्र्याचा, कलर्स मराठीच्या महानाट्याचा" या संकल्पनेनुसार प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या मालिकांमध्ये म्हणजेच जय जय स्वामी समर्थ मालिकेत ‘अध्याय स्वामीसेवेच्या भव्य कृपाप्रसादाचा’ सुरु होणार असून त्यात पहिल्यांदाच स्वामींची न्यायपरीक्षा बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये प्रत्यक्ष स्वामींवरच भक्तांकडून खटला उभा राहतो. ही अजब स्वामीलीला का घडते ? स्वामींना न्यायपरीक्षा का द्यावी लागणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. तर 'आई तुळजाभवानी' मालिकेत पवित्र चातुर्मास पर्व पाहायला मिळत आहे. त्यात भक्ती आणि श्रद्धेची नवी कसोटी प्रेक्षकांना अनुभवता येईल,ज्यातून तुळजाई भक्तांना एक अनोखी शिकवण देणारे आहे.
या मागणीमुळे स्वामींवरच खटला भरला जातो अन्..
पहिली गोष्ट 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेची आहे, जिथे प्रेक्षकांना एक अत्यंत रंजक प्रवास पाहायला मिळणार आहे. स्वामी सेवा कधीच व्यर्थ जात नाही; तिचं सुफळ योग्य वेळी मिळतंच. हे स्वामीश्रद्धेचे अत्यंत महत्वाचे गुरुतत्व मांडणाऱ्या या महिन्यात एक अनाकलनीय गोष्ट घडते. जिथे स्वामी एका जोडप्याकडे बारशाच्याच दिवशी त्यांच्या नवजात बाळाला त्यांना सोपवण्याची मागणी करतात आणि ही त्यांची मागणी दिवसेंदिवस टोकाची होत जाते. स्वामींची ही मागणी कशासाठी आहे आणि त्याचे प्रयोजन काय याचा उलगडा होण्याआधीच या मागणीमुळे स्वामींवरच खटला भरला जातो आणि ही गोष्ट अधिकाधिक गुंतागुंताची होत जाते. एका लहान बाळासाठी त्याच्या आई वडीलांकडे स्वामींनी धरलेला हट्ट एका अभूतपूर्व महानाट्याला जन्म देतो. भक्तांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतो, ज्याची उत्तरे या महानाट्यात उलगडणार आहेत.
श्रद्धेची होणारी कसोटी प्रेक्षकांना खिळवून ठेवणार
दुसऱ्या बाजूला 'आई तुळजाभवानी' मालिकेत चातुर्मास पर्वाला सुरुवात झाली असून,देवीभक्त उषाच्या सोळा सोमवारच्या व्रताची आणि निष्ठेची अत्यंत कठोर परीक्षा नियतीकडून घेतली जात आहे. चातुर्मासात भक्तांची श्रद्धा डळमळीत करून त्यांना भक्तीमार्गापासून दूर करण्यासाठी असुरी शक्तींकडून लोकांच्या मनात संशय, मोह आणि अधर्म पेरून भक्तीची शक्ती क्षीण करण्याचे डाव रचले जातात, देवांकडून दूर झालेल्या प्रत्येक जीवाला स्वतःकडे वळवून स्वतःची शक्ती वाढवण्याचा असुरांचा हा प्रयत्न आई तुळजाभवानी कसा मोडीत काढणार याचे भव्य महानाट्य या महिन्यात प्रेक्षकांसमोर साकारणार आहे. पहिल्या सोमवारच्या व्रतादरम्यान उषावर येणारे मोठे संकट आणि तिच्या श्रद्धेची होणारी कसोटी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. विशेष वेगळी गोष्ट म्हणजे या सर्व संकटांमध्ये भक्तांच्या श्रद्धेचे रक्षण करतानाच चातुर्मासाच्या कथेचा प्रभावी वापर करत आई तुळजाभवानी भक्तांना अनेक महत्वाचे धडे देणार आहे, या चातुर्मास पर्वात शिकवण देणारे हे दिव्य चमत्कार कसे घडतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
या संपूर्ण महानाट्यात स्वामींची न्यायपरीक्षा आणि चातुर्मास कथांमधून तुळजाईची दैवी शिकवण ही प्रेक्षकांसाठी, मनोरंजनाचा आणि भक्तीचा एक अद्भुत सोहळा घेऊन येत आहे, जिथे प्रत्येक वळणावर नवीन रहस्ये आणि भावनिक नाट्य उलगडत जाणार आहेत. पहा जय जय स्वामी समर्थ दररोज रात्री 8.10 आणि आई तुळजाभवानी दररोज रात्री ८.५० वा. आपल्या कलर्स मराठीवर.






















