Marathi serial: मनोरंजन विश्वातील ग्लॅमर, प्रसिद्धीचा झगमगाट आणि त्यामागचा संघर्ष यांची सांगड घालणारी ‘मोहिनी’ ही नवी मालिका लवकरच कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका सामान्य मुलीचा आणि फिल्मी दुनियेत राज्य करणाऱ्या सुपरस्टारचा प्रवास या मालिकेतून उलगडणार असून, पडद्यामागील वास्तव दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Continues below advertisement

कोण साकारणार मुख्य भूमिका?

या मालिकेत अनघा ठाकूर ‘मोहिनी’ची भूमिका साकारत आहे, तर समीर परांजपे ‘RK’ या सुपरस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोने मालिकेबद्दलची उत्सुकता वाढवली आहे. प्रोमोमध्ये शूटिंग सुरू होण्याआधी सेटवर निवांत वातावरण दिसते. मात्र RK ची एंट्री होताच सगळेच सतर्क होतात आणि कामाला वेग येतो.

दरम्यान, मेकअपसाठी धावत येणारी मोहिनी आणि पुढे चालत येणारा RK यांची अचानक धडक होते. त्यानंतर दोघांमध्ये झालेला संवाद हा मालिकेचा टर्निंग पॉइंट ठरतो. मोहिनीचा स्वाभिमानी स्वभाव आणि RK चा अहंकारी अंदाज यामुळे पुढील कथानक अधिक रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Continues below advertisement

 

निर्मात्यांच्या मते, ही मालिका केवळ प्रेमकहाणी नसून, मनोरंजन विश्वातील पडद्यामागील भावविश्वही दाखवणार आहे. प्रसिद्धीच्या झगमगाटात माणुसकी, मेहनत आणि स्वाभिमान किती महत्त्वाचे असतात, हा संदेश मालिकेतून दिला जाणार आहे. सुपरस्टारचा अहंकार आणि साध्या मुलीचा स्वाभिमान आमनेसामने आल्यावर नेमकं काय घडणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ‘मोहिनी’ ही मालिका लवकरच कलर्स मराठीवर प्रसारित होणार असून प्रेक्षकांच्या प्रतिसादाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.