CM Eknath Shinde on Atul Parchure : अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक मालिका,सिनेमे आणि नाटकांमधून अतुल परचुरे यांनी प्रेक्षकांचं अगदी खळखळून मनोरंजन केलं. अतुल परचुरे हे प्रदीर्घ काळापासून कर्करोगाशी झुंजत होते. दरम्यान अतुल परचुरे यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीही प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे. 


अतुल परचुरेंच्या जाण्याने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसलाय. ही सहन न करण्यासारखी गोष्ट असल्याची भावनिक प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी दिली आहे. तसेच चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट झाल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी शोक व्यक्त केला आहे. 


मुख्यमंत्री शिंदे यांनी काय म्हटलं?


मुख्यमंत्री शिंदे यांनी एक्स पोस्ट करत अतुल परचुरेंना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं की, चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट, रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारे, कधी डोळ्यात आसू उभे करणारे. कधी अंतर्मुख करणारे अभिजात अभिनेते अतुल परचुरे यांचे अकाली निधन वेदनादायी आहे. अतुल परचुरे यांनी बालरंगभूमीपासू्नच आपली देदिप्यमान अभिनय कारकीर्द गाजवली. नाटक, चित्रपट, मालिका या तिन्ही क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला.


पुढे त्यांनी म्हटलं की, तरुण तुर्क म्हातारे अर्क, नातीगोतीसारखी नाटकं असोत किंवा पु. ल. देशपांडे यांचा शाब्दिक, वाचिक विनोद असो, अतुल परचुरे यांनी आपल्या अंगभूत गुणांनी त्यात गहिरे रंग भरले.मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी उत्तम व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या जाण्यामुळे मराठीतला एक अभिजात अभिनेता हरपला आहे. हे नुकसान भरुन येण्यासारखे नाही. परचुरे यांच्या हजारो चाहत्यांपैकी एक या नात्याने कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याचं बळ ईश्वर त्यांना देवो. राज्य सरकारच्या वतीने मी त्यांना श्रध्दांजली वाहतो. ओम शांती.   






ही बातमी वाचा : 


प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अवलिया, 'मोहन प्यारे'ची मनाला चटका लावणारी एक्झिट, अतुल परचुरेंच्या अभिनयाचा 'तेजस्वी' प्रवास