Kolhapur News : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी आज (8 जून) कोल्हापुरात होत आहे. प्रचारातील आरोप प्रत्यारोप, राजकीय हस्तक्षेप यामुळे ही निवडणूक प्रचंड गाजली. 9 वर्षांनी पार पडत असलेल्या चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी 12 मतदान केंद्रांवरती मतदान झाले. मराठी मनोरंजनसृष्टीत मात्र, या निवडणुकीसाठी निरुत्साहच दिसून आला. प्रसिद्ध असणारे कलाकार दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी मतदानाकडे पाठ फिरविली. तुलनेने पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ यांच्यात उत्साह होता. एकूण 49.90% एवढं कमी मतदान झालं. आज मतमोजणी असून, चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वीच अंधश्रद्धेचा बाजार मांडल्याचं समोर आलं. खुर्चीवर लिंबू-अगरबत्ती दिसताच एकच खळबळ उडाली. नेमकं काय घडलं? पाहूया..
नेमके घडले काय?
आज सकाळी 9 वाजल्यापासून कोल्हापुरात मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी निकाल स्पष्ट होण्याची शक्यता असतानाच मतमोजणी केंद्रातील एका खुर्चीवर लिंबू आणि अगरबत्ती आढळल्याचा प्रकार समोर आला. यानंतर उपस्थितांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आले. मतमोजणी सुरू होत नाही, तोपर्यंत खुर्च्यांवर लिंबू मिरची अगरबत्ती ठेवत अंधश्रद्धेचा बाजार मांडला गेल्याने खळबळ उडाली. दरम्यान, हा प्रकार नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र मतमोजणी केंद्रात अशा वस्तू आढळल्याने चर्चांना उधाण आले असून निवडणुकीच्या निकालापूर्वीच वातावरण चांगलेच तापले आहे.
विजय पाटकर पॅनल -मेघराज राजेभोसले पॅनलमध्ये थेट लढत
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर पार पडत आहे. रविवारी राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, या निवडणुकीत केवळ 49 टक्के मतदान झाल्याची नोंद झाली. विशेष म्हणजे मुंबईत सर्वात कमी मतदान झाल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत अभिनेते विजय पाटकर यांच्या पॅनल आणि निर्माते मेघराज राजेभोसले यांच्या पॅनलमध्ये थेट लढत रंगली आहे. त्यामुळे चित्रपट महामंडळाची सत्ता नेमकी कोणाच्या हाती जाणार याकडे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे. दशकभरानंतर चित्रपट महामंडळाच्या 17 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून 14 जागांसाठी 44 उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत आहे .
दरम्यान मतदानासाठी कलाकार ,निर्माते, दिग्दर्शक यांचा निरुत्साह दिसून आला. कोल्हापूर केंद्रावर 746 पैकी 517 मतदारांनी मतदान केले.मिळालेल्या आकड्यानुसार राज्यात कोल्हापूरचे मतदान चांगले झाले.पुण्यातील दोन केंद्रांवर 724 पैकी 460 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मुंबईत पाच मतदान केंद्रांवर 1569 पैकी 539 मतदारांनी मतदान केले.सोलापूर केंद्रावर 146 पैकी 63 तर नाशिक येथे 219 पैकी 119 मतदारांनी मतदान केले.
