छोट्या पडद्यावरील लाडू या व्यक्तिरेखेमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेला बालकलाकार राजविरसिंह राजे गायकवाडचे चित्रपटात पदार्पण होणार आहे. 'भारत माझा देश आहे' या आगामी चित्रपटातून तो रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. देशभक्तीच्या भावनेने भरलेला ‘भारत माझा देश आहे’ हा चित्रपट येत्या ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटाची कथा एका गावातील आहे. या गावातील प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती भारतीय सैन्य दलात आहे. टीव्हीवर झळकलेल्या एका ब्रेकिंग न्यूजनंतर सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांची घालमेल, भीती या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटात मंगेश देसाई, हेमांगी कवी, शशांक शेंडे, छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याशिवाय या चित्रपटातून राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत हे दोन बालकलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या दोघांचाही हा पहिला चित्रपट असून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी व्यक्तिरेखा या बालकलाकारांनी साकारली आहे. यापूर्वी राजविरसिंह राजे गायकवाड मालिकेतील ‘लाडू’ या व्यक्तिरेखेमुळे घराघरांत पोहोचला. ‘भारत माझा देश आहे’च्या माध्यमातून राजविरसिंह चित्रपटात पदार्पण करत आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी सांगितले की," या चित्रपटात या दोन्ही बालकलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या दोघांच्या माध्यमातून आम्ही सामाजिक संदेश देण्याच्या प्रयत्न करत आहोत. हा चित्रपट प्रत्येक पाल्याने आपल्या पालकांसोबत आवर्जून पाहावा असा आहे. सामाजिक संदेश देण्याबरोबरच प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे. त्याशिवाय यात एका बकरीचीही प्रमुख भूमिका आहे. चित्रपट पाहिल्यावर बकरीची भूमिका महत्त्वाची कशी हे प्रेक्षकांना समजेल.
एबीसी क्रिएशन प्रस्तुत डॉ. आशिष अग्रवाल निर्मित या चित्रपटाची कथा पांडुरंग जाधव यांनीच लिहिली आहे. या चित्रपटाला समीर सामंत यांचे गीत लेखन केले आहे. तर, अश्विन श्रीनिवास यांनी संगीत दिले आहे. निशांत नाथाराम धापसे यांची पटकथा, संवाद असून निलेश गावंड यांनी 'भारत माझा देश आहे'चे संकलन केले आहे. या चित्रपटात छायांकन नागराज यांनी केले आहे.