Censor Board New Guidelines: तब्बल 35 वर्षांनंतर सेन्सॉर बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नार्कोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक पदार्थांशी संबंधित दृश्यांसाठी एक नवा नियम लागू करण्यात आला आहे. याशिवाय चित्रपटांच्या एज मार्कर्समध्येही बदल करण्यात आले आहेत.केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ अर्थात CBFC मध्ये नव्या सदस्यांचा समावेश केल्यानंतर आता नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने CBFCच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. यापूर्वी 1991 मध्ये CBFCच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. नव्या नियमांमध्ये बहुतांश जुन्या तरतुदी कायम ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय, केंद्र सरकारने केंद्रीय फिल्म प्रमाणन मंडळ अर्थात CBFCच्या नव्या बोर्डाची घोषणा केली असून, या 18 सदस्यांच्या बोर्डामध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

सेन्सॉर बोर्डाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

CBFCच्या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बहुतांश नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. मात्र, नार्कोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक पदार्थांशी संबंधित कंटेंटसाठी नवीन तरतूद करण्यात आली आहे. चित्रपटांमध्ये अशा पदार्थांचे सेवन किंवा तस्करीशी संबंधित दृश्य दाखवले जाणार असल्यास त्यासोबत प्रेक्षकांना इशारा देणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

ड्रग्सच्या सीन्ससोबत द्यावी लागणार वॉर्निंग

नव्या नियमानुसार चित्रपटात नार्कोटिक्स ड्रग्स किंवा सायकोट्रॉपिक पदार्थांचे सेवन आणि तस्करीशी संबंधित कंटेंट दाखवल्यास त्यासोबत एक अनिवार्य इशारा द्यावा लागेल.'अवैध नशेचे पदार्थ आरोग्य बिघडवतात आणि तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ड्रग्सला नकार द्या', अशा आशयाची ही वॉर्निंग असेल. त्यामुळे चित्रपटांमध्ये ड्रग्सशी संबंधित दृश्य दाखवताना आता हा इशारा देणं आवश्यक असणार आहे.

Continues below advertisement

 

35 वर्षांपूर्वी ड्रग्सबाबत काय होता नियम?

यापूर्वी 1991 मध्ये जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार चित्रपटांमध्ये ड्रग्सच्या व्यसनाचं ग्लोरिफिकेशन किंवा समर्थन करणारी दृश्य दाखवू नयेत, अशी तरतूद होती. नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मात्र ड्रग्सशी संबंधित कंटेंटसोबत अनिवार्य इशारा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

वयाच्या मार्कर्समध्येही बदल

CBFCच्या नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये चित्रपटांच्या एज मार्कर्समध्येही तीन नवीन श्रेणी जोडण्यात आल्या आहेत. यामध्ये UA 7+, UA 13+ आणि UA 16+ या मार्कर्सचा समावेश आहे. या श्रेणींनुसार संबंधित वयापेक्षा कमी वयाच्या मुलांनी चित्रपट पाहताना पालकांच्या देखरेखीखाली राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. CBFCचे चेअरपर्सन शशि शेखर वेम्पती यांनी एक्सवर एज मार्कर्सबाबत माहिती देताना सांगितलं की, चित्रपट निर्मात्यांनी प्रमोशनल मटेरियलमध्ये हे मार्कर्स स्पष्टपणे दाखवणं आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना चित्रपट दाखवण्यापूर्वी पालक आणि प्रेक्षकांना त्यातील वयोमर्यादा समजण्यास मदत होईल.

जुने नियमही कायम

नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये हिंसा, अश्लीलता, लैंगिक हिंसा, सांप्रदायिक मजकूर, राष्ट्रीय सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था आणि चित्रपट प्रमाणनाशी संबंधित इतर विद्यमान तरतुदी कायम ठेवण्यात आल्या आहेत. म्हणजेच 35 वर्षांनंतर मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आला असला तरी जुन्या नियमांपैकी बहुतांश नियम कायम आहेत. ड्रग्सशी संबंधित दृश्यांसाठी अनिवार्य चेतावणी आणि नव्या एज मार्कर्सचा समावेश हे यातील महत्त्वाचे बदल आहेत.

18 सदस्यांच्या बोर्डामध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश

केंद्र सरकारने केंद्रीय फिल्म प्रमाणन मंडळ अर्थात CBFCच्या नव्या बोर्डाची घोषणा केली असून, या 18 सदस्यांच्या बोर्डामध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. अभिनेता मनोज जोशी, सुनील शेट्टी, प्रीती झिंटा, पंकज त्रिपाठी, प्रसेनजीत चटर्जी आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासह संगीतकार रिकी केज यांना या बोर्डात स्थान देण्यात आलं आहे. याशिवाय विनोद अनुपम, अभिषेक जैन, हंसराज हंस, सुप्रिया यारलागड्डा, यतींद्र मिश्रा, रूपाली गांगुली, नीला माधब पांडा, पल्लवी जोशी, निशिगंधा वाड, वामन केंद्रे आणि रमेश पतंगे यांचाही नव्या बोर्डात समावेश आहे. त्यामुळे नव्या CBFC बोर्डात अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार, लेखक आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींचं प्रतिनिधित्व पाहायला मिळत आहे.