Mumbai: बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया सेलिना जेटलीने (Celina Jaitly)आपल्या ऑस्ट्रियन उद्योजक पती पीटर हॅगविरुद्ध गंभीर आरोप केलेत. अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत तिने शारीरिक अत्याचार, मानसिक छळ, करियर संपवणे तसेच मुलांपासून तोडल्याचे गंभीर आरोप केलेत. अंधेरी कोर्टाने पीटर हॅगला नोटीस जारी केली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 डिसेंबरला होणार आहे. तिने छळामुळे आपल्या करिअरला झालेल्या नुकसानीबद्दल 50 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे.सेलिनाने 2001 साली फेमिना मिस इंडिया स्पर्धा जिंकली होती.

Continues below advertisement

सेलिना जेटलीचे गंभीर आरोप, मुलांना तोडलं 

अभिनेत्री सेलिना जेटलीने तक्रारीत म्हटले आहे की, सततच्या मानसिक आणि शारीरिक अत्याचारामुळे तिला ऑस्ट्रियातील त्यांच्या घरातून मध्यरात्री पलायन करून 11 ऑक्टोबरला भारतात परतावे लागले. या घाईत तिला तिच्या तिन्ही मुलांना सोडून जावे लागले असा दावाही तिने केलाय.पितर हॅगने मुलांशी तिचा कोणताही संपर्क होऊ नये म्हणून सर्व मार्ग बंद केले. केवळ एकदाच (14 नोव्हेंबर रोजी) तिला मुलांशी व्हिडिओ कॉलवर बोलण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे सेलिनाने मुलांशी कोणत्याही अडथळ्यांविना संपर्क करता यावा अशी विनंती कोर्टाकडे केली आहे.

Continues below advertisement

50 कोटींची नुकसानभरपाई, मासिक 10 लाख देखभाल खर्चाची मागणी

तक्रारीत सेलिनाने पतीकडून दरमहा 10 लाख रुपये देखभालखर्च, तसेच छळामुळे आपल्या करिअरला झालेल्या नुकसानीबद्दल 50 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. शिवाय, आर्थिक अनियमितता व मालमत्ता नियंत्रण काढून घेतल्यामुळे झालेल्या इतर नुकसानीसाठीही दावा करण्यात आला आहे.

लग्नानंतर महागड्या भेटवस्तूंची मागणी?

सेलिना जेटलीच्या म्हणण्यानुसार, पीटर हॅग यांनी लग्नाच्या वेळी भारतीय परंपरेचा हवाला देत ब्राइडल गिफ्ट म्हणून लक्झरी कपडे, महागडे कफलिंक्स (किंमत 6 लाख रुपये) आणि दागिने (किंमत 10 लाख रुपये) मागितले होते.

करिअर सोडण्यास भाग पाडले, सेलिना जेटलीचा दावा

2012 मध्ये जुळ्या मुलांच्या जन्मानंतर पीटरने आपल्या अभिनय करिअरला विराम देण्यास भाग पाडल्याचा आरोप सेलिनाने केला आहे. तोपर्यंत ती दुबई आणि नंतर सिंगापूरमध्ये पतीच्या नोकरीसोबत स्थलांतरित होत राहिली. अधूनमधून केवळ वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी ब्रँड एंडोर्समेंट्स स्वीकारल्या, असेही तिने नमूद केले आहे.

सततचा मानसिक छळ आणि अपमानाची वागणूक

सेलिनाच्या तक्रारीत म्हटले आहे की, तिला वारंवार अपमानास्पद आणि वर्णद्वेषी वक्तव्यांचा सामना करावा लागत होता. मिस इंडिया आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे नाव कमावलेल्या व्यक्तीला सतत कमी लेखले जात असल्याने तिच्या आत्मविश्वासावर परिणाम झाला, असे तिने म्हटले आहे. या प्रकरणाचा निकाल काय लागतो, पीटर हॅग न्यायालयात काय भूमिका मांडतात आणि सेलिना जेटलीला मुलांशी बोलण्याची परवानगी मिळते का, हे पुढील सुनावणीत स्पष्ट होणार आहे.