Chandrapur : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात आजपासून चौथे झाडीपट्टी नाट्य संमेलन सुरू झाले आहे. विदर्भातील चार जिल्ह्यातल्या झाडीपट्टी नाट्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी झाडीपट्टी नाट्य संमेलन आयोजित केले जाते. यंदा प्रसिद्ध झाडीपट्टी कलाकार अनिरुद्ध वनकर संमेलनाध्यक्ष आहेत.
प्रसिद्ध दिग्दर्शक वामन केंद्रे, अभिनेत्री दिपाली सय्यद, माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला आहे. संमेलनाच्या प्रारंभी झाडीपट्टी रंगभूमीवरील विविध लोककला प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले. दरम्यान कुठल्याही सरकारी मदतीशिवाय झाडीपट्टी नाट्यकलेने घेतलेली झेप कौतुकास्पद असल्याची पावती मान्यवरांची याप्रसंगी दिली. या झाडीपट्टी कलेला राजाश्रय मिळावा यासाठी भक्कम पाठिंबा आवश्यक असल्याचे मत अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी उद्घाटनपर भाषणात मांडले आहे.
विदर्भातील नाट्यरसिकांसाठी झाडीपट्टी नाट्य संमेलन पाहणं ही पर्वणी ठरणार आहे. 17 आणि 18 सप्टेंबरला चंद्रपूरमध्ये झाडीपट्टी नाट्यसंमेलन पार पडत आहे. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग म्हणजे झाडीपट्टी. झाडीपट्टी आधी झाडीमंडळ या नावाने ओळखले जायचे. झाडीपट्टी पाहण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक मंडळी विदर्भात जात असत.
चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागात बोलली जाणारी भाषा झाडीबोली या नावाने प्रचलित आहे. गेल्या 150 वर्षांपालून लोककलावंत झाडीपट्टी हा कलाप्रकार सादर करत आहेत. भगीसोंड, दंडार, राधा, दंडीगान, खडी गंमत, डाहाका, कथासार गोंधळ, बैठकीचे पोवाडे यातूनच झाडीपट्टी या नाटकाटी उत्क्रांती झाली आहे.
संबंधित बातम्या