Year Ender 2022 : कोरोनाकाळानंतर मनोरंजनसृष्टी पुन्हा नव्या जोमाने उभी राहिली. ओटीटी प्लॅटफॉर्मचा दबदबा असतानाही अनेक सिनेमे (Movies) सिनेमागृहात प्रदर्शित झाले. अनेक बिग बजेट सिनेमे या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. तर दुसरीकडे मात्र काही सिनेमे वादाच्या भोवऱ्यात अडकले, बायकॉट ट्रेंडमुळे हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. जाणून घ्या 2022 मध्ये वादाच्या भोवऱ्यात कोणते सिनेमे अडकले...


लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) 


आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर खानचा (Kareena Kapoor Khan) 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा या वर्षातला फ्लॉप सिनेमा ठरला आहे. या सिनेमाला बॉयकॉट करण्यात आले होते. याचाच परिणाम थेट सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर झाला. हा सिनेमा 'फॉरेस्ट गंप' या हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. 


द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) 


'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. पण विवेक अग्निहोत्रींचा हा सिनेमा सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकला. आजही या सिनेमावर टीका केली जात आहे. हा सिनेमा नव्वदच्या दशकात काश्मीक खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या अमानुष अत्याचारांच्या घटणांचे वर्णन करणारा आहे. 


आदिपुरुष (Adipurush) 


'आदिपुरुष' या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा सिनेमा रामायणावर आधारित आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रभास आणि सैफच्या लूकला प्रचंड ट्रोल केलं. या सिनेमाच्या व्हीएफक्सवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या निर्माते या सिनेमावर पुन्हा काम करत असून पुढील वर्षी हा सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 


थॅंक गॉड (Thank God)


बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राचा 'थॅंक गॉड' हा सिनेमा दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील अजयच्या भूमिकेवरुन वाद निर्माण झाले होते. धर्माची चेष्टा केल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या होत्या. तसेच चित्रगुप्ताला चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. 


सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj)


'सम्राट पृथ्वीराज' हा 2022 या वर्षातला वादग्रस्त सिनेमा ठरला आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे या सिनेमाला अडचणींचा सामना करावा लागला. आधी या सिनेमाचे नाव 'पृथ्वीराज' ठेवण्यात आले होते. पण करणी सेनेने या सिनेमाला विरोध केल्यामुळे या सिनेमाचे नाव 'सम्राट पृथ्वीराज' असे ठेवण्यात आले. 


संबंधित बातम्या


Third Eye Asian Film Festival: 19 व्या थर्ड आय आशियाई महोत्सवाची 12 डिसेंबर पासून सुरुवात; आशा पारेख यांचा होणार सन्मान