मुंबई : सैराट आला आणि भल्याभल्यांची दिलं आर्चीच्या दरवाजावर येऊन धडकली. इंग्रजीचं झेड माहित नसलेल्या मुलालाही, तिच्या इंग्लिशमध्ये सांगू का.. लाजवून गेलं. त्यानंतर पुढं रिंकू दिसली 'कागर'मधून. तिथंही तिचं कौतुक झालं आणि रिंकूचा बाजारातला भाव वधारला.


बोर्डाची परीक्षा असो किंवा पिक्चर.. मीडियावाले हटकून तिची दखल घेतात हे सिनेमाच्या निर्मात्यांना बरोब्बर कळलंय. म्हणूनच वाट्टेल ती किंमत देऊन रिंकूला सिनेमा घेण्याची धडपड चालू आहे. म्हणूनच मंडळी सध्या मराठी इंडस्ट्रीत सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या हिरोइन्समध्ये रिंकूने नंबर एक मिळवला आहे.

आजपर्यंत सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी अशा ग्लॅमरस तारकांच्या मानधनाची चर्चा व्हायची. अभिनेत्रींना मराठीमध्ये साधारण 15 लाखांच्या घरात मानधन मिळतं. पण यावर कडी केलीय रिंकूने. रिंकूचं मानधन ऐकाल तर थक्क व्हाल. बाबो...

आगामी 'मेकअप' सिनेमात रिंकू दिसणार आहे. या सिनेमासाठी तिने किती मानधन घेतलंय माहितीय का... एनी गेसेस... तर या सिनेमासाठी निर्मात्याने रिंकूला देऊ केलेत तब्बल 27 लाख रुपये. तुम्ही म्हणाल. काय.. इतके पैसे.. तर होय. एका सिनेमासाठी इतक्या नवख्या अभिनेत्रीला 27 लाख मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

रिंकूची सगळी मॅनेजमेंट दिग्दर्शक नागराज मंजुळेची निर्मिती संस्था आटपाट करतं. तर आटपाट आणि निर्मात्यांमध्ये नुकताच रिंकूच्या मानधनाचा करार झाला आहे. रिंकूची मॅनेजमेंट तर आटपाट करतंच. शिवाय, रिंकूसाठी लागणारी सगळी सिक्युरिटीही आटपाट पुरवतं. पण ते आधीपासून आहे.

असो. एक नक्की.. ही सगळी कन्फर्म चर्चा आहे हं 'मेकअप' सिनेमाच्या गोटातली. दबक्या आवाजात बोलतायत सगळे. पण याला अधिकृत दुजोरा द्यायला मात्र कुणी तयार नाही. तर ते महत्त्वाचं नाही. तर मराठी सिनेमा आता घोडदौड करतोच आहे, त्याचवेळी कलाकारांचे गुण हेरुन निर्मातेही त्यांना मान आणि धन दोन्हीही भरभरुन देत आहेत असंच म्हणायला हवं, नाही का?