मुंबई : ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमातली रितेश आणि जेनेलिया यांची रिअल लाईफमधील जोडी अनेक वर्षांपासून पडद्यापासून दूर आहे. मात्र जेनेलियाला लवकरच मराठीत आणण्याची इच्छा असल्याचं रितेश देशमुखने सांगितलं. यासाठी चांगल्या विषयाच्या शोधात असल्याचंही तो म्हणाला.

एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’वर रितेशने दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी त्याने अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण उद्या (शनिवार)रात्री 9 वाजता एबीपी माझावर केलं जाणार आहे.

‘तुझे मेरी कसम’ या सिनेमाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. मराठवाड्यातील नांदेड, लातूरमध्ये अजूनही या सिनेमाचे शो लागतात. त्यामुळे या जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. मात्र यासाठी आपण विषयाच्या शोधात आहोत, असं रितेश म्हणाला.

जेनेलियासोबत मराठी सिनेमा करण्याची इच्छा आहे. मी मराठी आणि हिंदी या दोनच भाषेत सिनेमे करु शकतो. जेनेलियाने पाच भाषांमधील सिनेमात काम केलं आहे. पण तिच्यासोबत हिंदीत काम केलं असल्यामुळे आता मराठीत काम करण्याची इच्छा असून यासाठी एका चांगल्या विषयाच्या शोधात आहे, असं रितेश म्हणाला.

रितेश आणि जेनेलियाचा ‘तुझे मेरी कसम’ हा सिनेमा 3 जानेवारी 2003 रोजी रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. रिल लाईफमधली ही जोडी या सिनेमानंतरच रिअल लाईफमध्येही विवाहबंधनात अडकली होती.