Vivek Oberoi on SHahrukh khan: बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याने नुकताच एक दावा केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, आज ज्या प्रमाणात शाहरुख खानचं नाव आणि लोकप्रियता आहे, ते पुढील 25 वर्षांत लोक त्याला विसरूनही जातील. काही दिवसांपूर्वीच 60 वर्षांचा झालेला शाहरुख तीन दशकांहून अधिक काळापासून चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवत आहे. विवेक म्हणाला, काळाच्या ओघात सर्वांचे अस्तित्व धूसर होत जाते. एका मुलाखतीत विवेक ओबेरॉय म्हणाला की वेळ जसजशी पुढे जाते, तसतसे प्रत्येक जण इतिहासाच्या पानांवर फक्त एक ‘फुटनोट’ बनून राहतो. त्याने उदाहरण देत सांगितले की, कधी काळी सिनेमा विश्वात देवासमान मानले जाणारे राज कपूर आजच्या तरुण पिढीला फारसे परिचित नाहीत.
“2050 मध्ये लोक म्हणतील ‘शाहरुख खान कोण?’”
‘पिंकविला’शी बोलताना विवेक म्हणाला, “आज तुम्ही कोणालाही 1960 च्या दशकातील चित्रपटांविषयी काही विचारलंत, तर बहुतेकांना काहीच ठाऊक नसतं. माणूस इतिहासापुरताच मर्यादित होऊन जातो. कदाचित 2050 मध्ये लोक विचारतील,‘शाहरुख खान कोण?’ यानंतर त्याने पुन्हा एकदा राज कपूर यांचा संदर्भ घेत त्याने सांगितले की, रणबीर कपूरचे अनेक तरुण फॅन्सला त्याच्या आजोबांबद्दल फारसे माहीतही नसतील. “आज बर्याच जणांना ‘राज कपूर कोण?’ असा प्रश्न पडतो. तुम्ही-आम्ही त्यांना सिनेमाचा देव मानतो, पण आजच्या पिढीतील मुलांना याबद्दल माहिती नसते. त्यामुळे इतिहास अनेकांना विस्मृतीत ढकलतो,” असेही तो म्हणाला.
शाहरुखची कायम असलेलं स्टारडम
शाहरुख खान गेल्या काही दशकांत बॉलिवूडमधील सर्वांत मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक राहिला आहे. ‘झिरो’ फ्लॉप झाल्यानंतर जवळपास चार वर्षांनी त्याने ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांद्वारे भव्य पुनरागमन केले. या तीन चित्रपटांनी मिळून जागतिक स्तरावर 2600 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. त्याच्या पुढील चित्रपट ‘किंग’चा टीझर त्यांच्या 60व्या वाढदिवशी प्रदर्शित झाला. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात सुहाना खान, दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी, राघव जुयाल, अर्शद वारसी, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक कलाकार दिसणार आहेत.
ओटीटीवरील अलीकडील उपस्थिती
अलीकडेच शाहरुख नेटफ्लिक्सवरील त्यांचा मुलगा आर्यन खानच्या डेब्यू शो ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’मध्ये कॅमियो भूमिकेत दिसले. या शोमध्ये एस.एस. राजामौली, करण जोहर, आमिर खान, सलमान खान, रणवीर सिंग आणि इतर अनेक दिग्गज कलाकारही विशेष भूमिकेत झळकले. या शोचे निर्मितीकार्यही शाहरुखनेच पाहिले आहे. विवेकचे विधान सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे; मात्र शाहरुखची जादू अजूनही अबाधित असल्याचं चित्र कायम आहे.