Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम चंद्रकांत गोखले (Vikram Gokhale) यांचे निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयानं अनेक रसिकांच्या मनावर छाप सोडली. विक्रम गोखले यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जाणून घेऊयात त्यांचा जीवनप्रवास...
विक्रम गोखले यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1945 रोजी झाला. विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या कुटुंबाकडून मिळाला. त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या. तर त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते.
रंगभूमी गाजवली
विक्रम गोखले यांना बाळ कोल्हटर यांनी त्यांच्या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर रंगभूमीवरील त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. विक्रम गोखले यांनी पाच वर्ष बाळ कोल्हटर यांच्यासोबत काम केलं. विजया मेहता यांच्या बॅरिस्टर या नाटकामध्ये काम केलं. विक्रम गोखले यांचे पहिलं गाजलेलं व्यावसायिक नाटक हे स्वामी होतं. या नाटकामधील विक्रम गोखले यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अभिनयासोबत त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन देखील केलं. नकळत सारे घडले, महासागर, समोरच्या घरात या त्यांच्या नाटकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये देखील केलं काम
अकेला, अग्निपध , ईश्वर, हम दिल दे चुके सनम, घर आया मेरा परदेसी या हिट हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं या सुखांनो या, अग्निहोत्र, संजीवनी , सिंहासन या मालिकामधील विक्रम गोखले यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नटसम्राट, माहेरची साडी, लपंडाव , वजीर हे त्यांचे मराठी चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी या चित्रपटामध्ये देखील विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली. या चित्रपटामध्ये विक्रम जोशी यांच्याबरोबरच जितेंद्र जोशी, अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोन यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. अनेकांनी या चित्रपटाच्या कथानकाचे आणि चित्रपटातील कालाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले. तसेच 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत देखील त्यांनी एन्ट्री केली होती. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर त्यांनी या मालिकेमध्ये काम केले. या मालिकेत त्यांनी पंडीत मुकुल नारायण नारायण ही भूमिका साकारली.