लखनौ : वादाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली असली तरी ‘पद्मावती’समोरची संकटं थांबायचं नाव घेत नाहीत. विविध ठिकाणी विरोध सुरु असतानाच आता उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही सिनेमाला विरोध दर्शवला आहे.


सिनेमातील आक्षेपार्ह दृष्य हटवले नाही, तर सिनेमा उत्तर प्रदेशात रिलीज होऊ देणार नाही, असा इशारा केशव प्रसाद मौर्य यांनी दिला आहे. त्यामुळे ‘पद्मावती’च्या विरोधाला आता पूर्णपणे राजकीय स्वरुप प्राप्त झालं आहे. दुसरीकडे करनी सेनेचाही विरोध कायम आहे.

दरम्यान यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही हा सिनेमा रिलीज न होऊ देण्याची मागणी केली होती. सिनेमा रिलीज झाला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं ते म्हणाले होते.

प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

‘पद्मावती’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडली आहे. 1 डिसेंबर रोजी रीलिज होणारा हा सिनेमा पुढे ढकलण्यात आला आहे. नवीन रीलिजिंग डेट लवकरच जाहीर केली जाणार आहे.

सीबीएफसीकडून अद्याप पद्मावती चित्रपटाला सर्टिफिकेट मिळालेलं नाही. त्यातच या सिनेमाचं मीडिया स्क्रीनिंग केल्यामुळे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी नाराज होते.

रणवीर सिंग, दीपिका पदुकोन आणि शाहीद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘पद्मावती’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. राजपूतांच्या राणीचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप करत करणी सेनेने सिनेमाला विरोध केला आहे. पद्मावती कधी प्रदर्शित होणार, याबाबत अद्याप मौन बाळगण्यात आलं आहे.

निर्माते व्हायाकॉम 18 यांनी मात्र आपण स्वेच्छेने सिनेमाचं प्रदर्शन लांबणीवर टाकत असल्याचा दावा प्रसिद्धीपत्रकात केला आहे. सीबीएफसीबद्दल आपल्याला आदर असल्याचं सांगत लवकरच सिनेमाला हिरवा कंदील मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

‘राजपूतांची परंपरा आणि सन्मान यांचं चित्रण पद्मावतीमध्ये केलं आहे. ही कहाणी पाहून प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरुन येईल, आम्ही कायद्याचं पालन करणारे जबाबदार नागरिक आहोत. लवकरच सिनेमाला हिरवा कंदील मिळेल. रीलिजिंग डेट लवकरच जाहीर करु’ असं व्हायाकॉमने म्हटलं आहे.