TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 


Dharmaveer : 'धर्मवीर' ठरला 2022 मधला सर्वात मोठा सुपरहिट ब्लॉकबस्टर मराठी सिनेमा; सिनेमाच्या टीमने मानले मानले आभार


'धर्मवीर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाला. आता या सिनेमाने नवा विक्रम केला आहे. 'धर्मवीर' सिनेमा 2022 मधला सर्वात मोठा सुपरहिट ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 50 दिवसदेखील पूर्ण झाले आहेत. त्यामुळेच सिनेमाच्या टीमने खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत


एक-दोन नव्हे तब्बल 22 कलाकारांसह हास्याचा बूस्टर डोस!


कोरोनाच्या दोन लसीनंतर हास्याचा एक बूस्टर डोस घेऊन ‘झोलझाल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाला आहे. प्रेक्षकांना मनमुरादपणे हसायला लावण्यास अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत 'युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन' अंतर्गत आणि 'रोलींगडाईस' असोसिएशन सोबत निर्माते गोपाळ अग्रवाल निर्मित 'झोलझाल' हा चित्रपट आज सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील हास्याची मेजवानी किती रुचकर असणार, हे आपण चित्रटातील ठसकेदार गाण्यांनी आणि चित्रपटाचा ट्रेलरने पहिलीच आहे.


‘तारक मेहता...’मध्ये ‘नट्टू काकां’ची वापसी!


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील प्रेक्षकांचे लाडके पात्र ‘नट्टू काका’ साकारणारे अभिनेते ​​घनश्याम नायक यांच्या निधनाला आता नऊ महिने पूर्ण झाले आहेत. मालिकेचे चाहते आता ‘नट्टू काका’ या पत्राला खूप मिस करत आहेत. मात्र, आता लवकरच ‘नट्टू काका’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘नट्टू काका’ या पात्रासाठी निर्मात्यांना नवीन अभिनेता सापडला आहे. गुजराती इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते किरण भट्ट आता या शोमध्ये नट्टू काकांची भूमिका साकारताना दिसणार आहे.


एका एपिसोडसाठी करण जोहर घेतो तब्बल एक ते दोन कोटींचे मानधन


सिने निर्माता करण जोहरचा 'कॉफी विथ करण' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करणचे चाहते या कार्यक्रमासाठी उत्सुक आहेत. 7 जुलैपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार असला तरी आतापासूनच या कार्यक्रमाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या एका एपिसोडसाठी करण एक ते दोन कोटींचे मानधन घेतो. 


'धर्मवीर'ची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकने एकनाथ शिंदेंना दिल्या शुभेच्छा


एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची नुकतीच शपथ घेतली आहे. आज (30 जूनला) त्यांचा शपथविधी पार पडला. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मनोरंजनसृष्टीतील मंडळीदेखील नव्या सरकारला शुभेच्छा देत आहेत. यात प्रसाद ओक, शरद पोंक्षे, आरोह वेलणकरसह अनेक कलाकारांचा सहभाग आहे. 'धर्मवीर'ची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकने खास पोस्ट शेअर करत एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


क्लीन चिट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा आर्यन खानने ठोठावले कोर्टाचे दरवाजे


क्रूझ ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून क्लीन चिट मिळालेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याने गुरुवारी विशेष एनडीपीएस कोर्टात आपला पासपोर्ट परत मिळावा यासाठी याचिका दाखल केली. याप्रकरणी न्यायालयाने एनसीबीला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 13 जुलैची तारीख निश्चित करण्यात आली आहे.


'राजी-नामा'त दिसणार ‘खुर्ची’साठीचे राजकीय युद्ध


सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. काही अनपेक्षित उलथापालथ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आधारित 'राजी-नामा' ही जबरदस्त वेबसीरिज 'प्लॅनेट मराठी' ओटीटीवर लवकरच झळकणार आहे.


'बदाम... बदाम... कच्चा बदाम' गाणं गाणाऱ्या भुवन बडायकरने केलं अभिनय क्षेत्रात पदार्पण; रंगभूमीपासून करणार सुरुवात


काही दिवसांपूर्वी 'बदाम... बदाम... कच्चा बदाम' या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून या गाण्यामुळे भुवन बडायकर चांगलाच लोकप्रिय झाला. आता भुवन बडायकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भुवनने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. भुवन आता प्रायोगिक रंगभूमीवर काम करण्यास सज्ज झाला आहे. 


येत्या रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार 'बहुरूपी अशोक'


मराठी सिनेसृष्टीतील ‘मामा’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अशोक सराफ सर्वांनाचं आपलेसे वाटतात. अशोक सराफ यांनी मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार सिनेमे दिले आहेत. त्यांना विनोदाचा बादशहा म्हणून ओळखलं जातं. अशोक सराफ यांनी नेहमीचं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली असून त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदाचा रविवार प्रेक्षकांसाठी खास आहे. रविवारी प्रेक्षकांना 'बहुरूपी अशोक' हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. 


‘एक रिक्षाचालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...’, कंगना रनौतकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खास शुभेच्छा!


एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची नुकतीच शपथ घेतली आहे. 30 जूनला त्यांचा शपथविधी पार पडला. या नव्या मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मनोरंजनसृष्टीतील मंडळीदेखील शुभेच्छा देत आहेत. आता बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत हिने देखील अंदाजात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहे.