TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 


ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले पुन्हा एकदा झलकणार रुपेरी पडद्यावर


'तो, ती आणि फुजी' हा रोमॅंटिक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठीतला प्रयोगशील दिग्दर्शक मोहित टाकळकर सांभाळणार आहे. भारत आणि जपानमध्ये घडणाऱ्या या प्रेमकहाणीमध्ये ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले मुख्य भूमिकेत आहेत.


'बस बाई बस'च्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावे दिसणार नव्या भूमिकेत!


'बस बाई बस' या कार्यक्रमातून अभिनेता सुबोध भावे प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीस येणार आहे. 'बस बाई बस' हा कार्यक्रम 29 जुलैपासून शुक्रवार आणि शनिवार रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात काही सुप्रसिद्ध महिला व्यक्तिमत्व उपस्थित राहणार असून, सुबोध त्यांच्याशी संवाद साधणार आहे. सुबोध भावे प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम करत असतो. आता सुबोध स्त्रियांसाठी लेडीज स्पेशल बस घेऊन येणार आहे.


राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही शाबासकी : नचिकेत बर्वे


सिनेमाला लोकप्रिय हिंदी सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नचिकेत म्हणाला,"राष्ट्रीय पुरस्कार मला जाहीर होणं हे खूप आनंददायी आहे. आपण जे काम करतो ते आपण प्रामाणिकपणे करत असतो. तान्हाजी हा ऐतिहासिक सिनेमा होता. या सिनेमासाठी खूप अभ्यास करावा लागला. मेहनत घ्यावी लागली होती. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हे शाबासकी मिळण्यासारखं आहे". 


'एकदा काय झालं' सिनेमाचा ट्रेलर आऊट


'एकदा काय झालं' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझरला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर प्रेक्षक या सिनेमाच्या ट्रेलरची अतुरतेने वाट बघत होते. ट्रेलरवरून वडिल-मुलाच्या नाजूक नात्याला या कथेतून स्पर्श केलेला दिसतो. तसेच गोष्ट प्रभावीपणे सांगणाऱ्या माणसाच्या आयुष्याचीच गोष्ट या सिनेमातून साकारण्यात आल्याचेही ट्रेलरमध्ये स्पष्ट होत आहे. 


'कॉफी विथ करण'च्या मंचावर येणार विजय देवरकोंडा अन् अनन्या पांडे


सिने-निर्माता करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाचे सातवे पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या तीन भागांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आता चौथ्या भागात दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे दिसणार आहेत. 


रणवीर सिंह विरोधात गुन्हा दाखल


बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या चर्चेत आहे. त्याचे न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच अभिनेता रणवीर सिंह विरोधात न्यूड फोटोशूटप्रकरणी चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 


राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये निलेश गावंडचा बोलबाला


राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये निलेश गावंडचा बोलबाला पाहायला मिळत आहे. सर्जनशीलतेच्या जोरावर निलेश गावंडने सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये निलेशने संकलित केलेल्या सिनेमांनी बाजी मारली आहे. 


दिग्दर्शक हंसल मेहता यांना कोरोनाची लागण!


बॉलिवूडचे दिग्गज चित्रपट निर्माते-दिग्दर्शक हंसल मेहता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले असून, त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे चाहत्यांना ही माहिती दिली आहे. हंसल मेहता यांनी त्यांच्या इन्स्टा पोस्टमध्ये सांगितले की, त्यांना कोरोना संसर्ग झाला आहे आणि यावेळी त्यांची लक्षणे फारशी सौम्य नाहीत. त्यांनी त्यांच्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले की, 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. लक्षणे फारशी सौम्य नाहीत. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना मी आवश्यक पावले उचलण्याची विनंती करेन. कृपया सुरक्षित रहा.'


'घे टकाटक, दे टकाटक', बहुचर्चित 'टकाटक 2'चं धम्माल टायटल साँग प्रदर्शित!


लेखक-दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'टकाटक 2'च्या टायटलप्रमाणेच याचं शीर्षकगीतही अगदी टकाटक बनलं आहे. 'घे टकाटक दे टकाटक...' असे या टायटल ट्रॅकचे बोल आहेत. गीतकार जय अत्रेनं 'घे टकाटक दे टकाटक...' हे गीत लिहिलं असून, गायक हर्षवर्धन वावरे आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी आपल्या सुमधूर आवाजात गायलं आहे. संगीतकार वरुण लिखते यांनी या गीताला स्वरसाज चढवण्याचं काम केलं आहे.


'समायरा' उलगडणार एका असाधारण प्रवासाची गोष्ट


ऋषी श्रीकृष्ण देशपांडे दिग्दर्शित 'समायरा' या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली असून येत्या 26 ऑगस्ट रोजी ‘समायरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरमध्ये अभिनेत्री केतकी नारायण अव्हेंजर गाडी चालवताना दिसत असून तिच्या चेहऱ्यावर एक ध्येय साध्य करण्याचा आत्मविश्वास दिसत आहे. तिच्या ध्येयापर्यंतचा हा असाधारण प्रवास आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.