TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


‘शाबास मिथू’ चा जबरदस्त ट्रेलर रिलीज


बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू सध्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. आता लवकरच तिचा  'शाबास मिथू' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तापसी भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. तापसीनं 'शाबास मिथू' चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. 


'शमशेरा' सिनेमातील रणबीर कपूरचा लूक आऊट


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या 'शमशेरा' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात संजय दत्त आणि वाणी कपूरदेखील दिसणार आहे. नुकताच 'शमशेरा' सिनेमातील रणबीरचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आलिया भट्टनेदेखील सोशल मीडियावर रणबीरचा लूक शेअर केला आहे. 


बॉक्स ऑफिसवर शिल्पा शेट्टीचा 'निकम्मा' जोरदार आपटला


बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि आग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू देसानीचा 'निकम्मा' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला आहे. सिनेमा चांगली कमाई करत नसल्याने निर्मात्यांनी या सिनेमाचे अनेक शो रद्द केले आहेत. 


आर. माधवनच्या Rocketry: The Nambi Effect सिनेमाचे नवे पोस्टर आऊट


बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवन सध्या 'रॉकेट्री:  नांबी इफेक्ट' या सिनेमामुळे चर्चेत आहे. रिलीजआधीच हा सिनेमा चर्चेत आला आहे. 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये या सिनेमाचा प्रीमिअर झाला होता. या महोत्सवातदेखील या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता या सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. 


रिलीज होण्याआधी कोर्टात होणार 'जुग जुग जियो'चं स्क्रीनिंग


अभिनेता वरुण धवन, कियारा आडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांचा जुग जुग जियो हा चित्रपट 24 जून रोजी रिलीज होणार आहे. सध्या या चित्रपटाची टीम या सिनेमाचे प्रमोशन करत आहे.  या चित्रपटाची निर्मिती करण जोहरनं केली आहे. पण जुग जुग जियो चित्रपट रिलीज होण्याआधी या चित्रपटाचं स्क्रीनिंग हे कोर्टामध्ये करण्याचा आदेश रांची कोर्टानं दिला आहे. 


'चुकीला माफी नाही'; 'दगडी चाळ 2' चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज


चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ 2' हा चित्रपट येत्या 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुफान कोसळणारा पाऊस आणि अनेक लोकांच्या घोळक्यातून समोर येणारे अरुण गुलाब गवळी म्हणजेच मकरंद देशपांडे यांची दमदार एन्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणार आहे, हे नक्की. 


प्रियंका चोप्राने पूर्ण केली 'सिटाडेल'ची शूटिंग; देसी गर्लने व्हिडीओ केला शेअर


बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिच्या पहिल्या वहिल्या वेबसीरिज 'सिटाडेल'ची शूटिंग पूर्ण केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत या वेबसीरिजची शूटिंग सुरू होती. प्रियंकाने आता व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रियंकाची ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. 


अभिनेत्री रश्मिरेखा ओझाची आत्महत्या; लिव-इन-पार्टनर कारणीभूत असल्याचा वडिलांचा आरोप


गेल्या काही दिवसांत मनोरंजन क्षेत्रातील अनेक अभिनेत्री आत्महत्या करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच ओडिशातील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिरेखा ओझाने वयाच्या 23 व्या वर्षी आत्महत्या केली आहे. पोलिसांना तिचा मृतदेह मिळाला आहे. रश्मिरेखाच्या वडिलांनी तिच्या लिव-इन-पार्टनरवर आरोप लावले आहेत. 


कंगनाचा 'धाकड' आता ओटीटीवर येणार


बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा 'धाकड' सिनेमा 20 मे ला सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून या सिनेमाने चांगलीच निराशा केली आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. पण सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. पण आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 


'किचन कल्लाकार' घेणार प्रेक्षकांचा निरोप? ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ होणार सुरू


झी मराठीवर ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ हा रिऍलिटी शो लवकरच सुरू होणार आहे. हा कार्यक्रम खास बालकलाकारांसाठी आयोजित करण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमासाठी ऑडिशन होत आहेत. ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ हा कार्यक्रम आता सुरू होणार असल्याने 'किचन कल्लाकार' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असे म्हटले जात आहे.