मुंबई : आयपीएस अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या एका अभिनेत्रीला खोट्या प्रकरणात गोवून, तिला अटक करुन तिचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आंध्र प्रदेशातल्या तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुंबईतील एका अभिनेत्रीला खोट्या प्रकरणात गोवणं, तिला अटक करणं आणि तिचा छळ करण्याचे आरोप या तिघांवर सिद्ध झाले आहेत. सरकारनं यासंबंधी खात्यांतर्गत चौकशी केली होती.
अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक करुन छळ
मुंबईतील एका मॉडेल आणि अभिनेत्रीने (Mumbai Based Actress) एका व्यासायिकाविरोधात लैंगिक छळाची तक्रार दिली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव होता. पण, तिने तक्रार मागे घेतली नाही, म्हणून तिला आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलं आणि तिचा सुमारे दीड महिना शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणात तीन आयपीएस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला.
लैंगिक अत्याचाराची तक्रार मागे घेण्यासाठी दबाब
उद्योगपती आणि वायएसआर काँग्रेसचे नेते कुक्काला विद्यासागर यांच्याविरुद्ध या अभिनेत्रीनं मुंबईत लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. ती मागं घेण्यासाठी पोलीस अधिकारी दबाव टाकत होते. पण त्या अभिनेत्रीनं त्याला भीक घातली नाही. त्यामुळं तिच्याविरुद्ध खोटं प्रकरण उभं करुन या अधिकाऱ्यांनी अभिनेत्री आणि तिच्या आईवडिलांना 2 फेब्रुवारी रोजी अटक झाली होती. तब्बल 42 दिवसांनंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
तीन वरिष्ठ आयपीएस अधिकारी निलंबित
आंध्र प्रदेश सरकारने तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. त्याच्यावर मुंबईतील एका अभिनेत्रीला सापळ्यात अडकवणे, अटक करणे आणि त्रास दिल्याचा आरोप आहे. पीएसआर अंजा नेयुलू, कांथी राणा टाटा आणि विशाल गुन्नी अशी निलंबित करण्यात आलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांची नावे आहेत. तपास अहवालात तिघांकडून पदाचा गैरवापर केल्याचे तपासात समोर आले आहे.
अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनुसार अटकेत असताना पोलिसांनी तिला आणि तिच्या पालकांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांपासून वंचित ठेवले, वकील आणि नातेवाईकांनाही भेटू दिले नाही. तसेच शारीरिक आणि मानसिक छळ केला. तसेच, मुंबईतील तक्रार मागे न घेतल्यास इतर राज्यातही खोटे गुन्हे दाखल केले जातील, असे धमकावल्याचाही आरोप अधिकाऱ्यांवर केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :