The Elephant Whisperers : ऑस्कर विजेता 'द एलिफेंट व्हिस्परर्स' (The Elephant Whisperers) हा माहितीपट सध्या चर्चेत आहे. या माहितीपटातील बोमन आणि बेली या जोडप्याने आता 'द एलिफेंट व्हिस्परर्स'च्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. निर्मात्यांनी पैसे दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे ऑस्कर (Oscar) जिंकुनही त्यांच्या पदरी निराशाच आहे.


कार्तिकी गोंसाल्वेस आणि सिख्या एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत 'द एलिफेंट व्हिस्परर्स' या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. माहितीपटाला यश मिळाल्यानंतर निर्मात्यांनी त्यांच्यासोबत दुर्व्यवहार केल्याचं त्यांनी एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. 


बोमन आणि बेलीचे निर्मात्यांवर आरोप


'द एलिफेंट व्हिस्परर्स' या माहितीपटाच्या शूटिंगदरम्यान कार्तिकी गोंसाल्वेसचे बोमन आणि बेली यांच्यासोबत चांगले संबंध होते. पण माहितीपटाला ऑस्कर मिळाल्यानंतर त्यांचं वागणं बददलं. या माहितीपटालील लग्नाचं सीन शूट करण्यासाठी आम्हाला आमच्या नातीच्या शिक्षणासाठी साठवलेले पैसे खर्च करावे लागले. या एका गोष्टीसाठी आमचे तब्बल एक लाख रुपये खर्च झाले. आम्हाला आमचे पैसे परत मिळतील असा कार्तिकिने तेव्हा दावा केला होता. पण अद्याप आम्हाला आमचे पैसे मिळालेले नाहीत. आम्ही जेव्हा आता त्यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काही ना काही कारणाने ते आमच्यासोबत बोलणं टाळतात.


आम्हाला पुरस्काराला हात लावू दिला नाही : बोमन आणि बाली


बोमन आणि बाली पुढे म्हणाले,"द एलिफेंट व्हिस्परर्स'ला जगात यश मिळू लागल्यानंतर निर्मात्यांचं आमच्यासोबतचं वागणं बदललं. तसेच आम्हाला ऑस्करच्या पुरस्काराला हात लावू दिला नाही. आम्ही आमच्या घरी परतल्यानंतर आमच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे आमचे पैसे देण्याची मागणी केली. पण आता आमच्याकडे पैसे नाहीत, असं म्हणत त्यांनी टाळाटाळ केली". 


'द एलिफंट व्हिस्परर्स' या माहितीपटाला 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. तामिळनाडूतील एक कुटुंब बेबंद हत्तींना दत्तक घेतं आणि त्यांचं कसं संगोपन करतं यावर बेतलेला हा माहितीपट आहे. माहितीपटाला यश मिळाल्यानंतर तामिळनाडू सरकारने बोमन आणि बेली यांना घर आणि प्रत्येकी एक लाख रुपयांचं बक्षीस देण्याचं जाहीर केलं होतं. 


'द एलिफंट विस्परर्स' या माहितीपटाने इतिहास घडवला आहे. हत्तींचं संगोपन आणि संवर्धन यावर भाष्य करणाऱ्या या डॉक्युमेंट्रीला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. कार्तिकी गोन्साल्विस या दिग्दर्शिकेची ही पहिलीच डॉक्युमेंट्री आहे. 


संबंधित बातम्या


Oscars 2023 : 'ऑस्कर' पुरस्कार जिंकलेला 'The Elephant Whisperers' कुठे पाहू शकता? जाणून घ्या डॉक्युमेंट्रीबद्दल सर्वकाही...