मुंबई: झाकीर नाईक प्रकरणावरून आज बॉलीवूड अभिनेता आमीर खान आणि शाहरूख खान यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. झाकीर नाईक प्रकरणावरून आमीर खानला प्रश्न विचारला असता, त्याने जाहिर प्रतिक्रीया दिली.
दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो: आमीर खान
झाकीर नाईकच्या भाषणांवर बंदीच्या मागणी संदर्भात आमीर खानला विचारले असता, त्याने दहशतवादाला कोणताही धर्म नसतो अशी प्रतिक्रीया दिली. आमीर खानने झाकीर नाईक प्रकरणावरून उघड भूमिका घेतली असताना, दुसरीकडे बॉलीवूडमधील आणखीन एक सुपरस्टार शाहरूख खानने मात्र मौन बाळगले आहे.
वाढदिवस वाईट प्रकारे साजरा झाला, मात्र ईद तशी साजरी करायची नाही: शाहरूख
शाहरूखने गेल्या वर्षी आपल्या 50 व्या वाढदिवसानिमित्त देशात असहिष्णूता वाढल्याचे बोलले होते. याची आठवण करून देऊन त्याने मौन बाळगले. शाहरूखला यासंबंधी प्रश्न विचारला असता, ''मला माझा वाढदिवस वाईट पद्धतीने साजरा करावा लागला, पण ईदच्या उत्साहावर विरजण पडू द्यायचे नाही.'' अशी प्रतिक्रीया दिली. असहिष्णूतेच्या मुद्द्यावरून आमीरने दिलेल्या प्रतिक्रीयेमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यावर शाहरूखने प्रतिक्रीया व्यक्त केल्याने वादात आणखीनच भर पडली होती. मात्र, सध्या निर्माण झालेल्या वादावरून आमीरने जाहीर वक्तव्य केले आहे.