मुंबई : अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर छेडछाडीचा आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तनुश्रीने तिला त्रास देणाऱ्या कलाकारांना शाप दिला आहे. तनुश्रीने अभिनेते नाना पाटकेर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, दिग्दर्शक राकेश सारंग, निर्माता सामी सिद्दीकी आणि अभिनेत्री राखी सावंत यांना शाप दिला आहे. तसेच ती म्हणाली की, माझा शाप तुम्हाला भोवणार आहे. त्यापासून तुम्ही वाचू शकणार नाही.
तनुश्री म्हणाली की, "कुठलाच देव तुम्हाला वाचवायला येणार नाही. 10 वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटातील गाण्यासाठी नृत्य दिग्दर्शक म्हणून मी स्वतः गणेश आचार्यच्या नावाची शिफारस केली होती. परंतु जेव्हा मी अडचणीत होते आणि मला त्याच्या मदतीची आवश्यकता होती, तेव्हा त्याने मला टाळले. मी जेव्हा पोलिसांत तक्रार केली, तेव्हा एफआयआरमध्ये त्याचेही नाव नमूद केले आहे."
तनुश्री म्हणाली की, "हार्न ओके प्लीजच्या सेटवर केवळ नाना पाटेकरने माझे शोषण केले नसून चार लोकांनी माझे शोषण केले होते. तेव्हा मी फक्त 24 वर्षांची होते, माझे करिअर घडवण्यासाठी धडपडत होते. गणेश आचार्यने तेव्हा माध्यमांशी बोलताना माझ्याबद्दल अपप्रचार केला. त्यामुळे बॉलिवूडमधील माझे करिअर संपुष्टात आले."
तनुश्रीने केवळ नाना आणि गणेशचे नाव घेतले नसून ती म्हणाली की, "राखी सावंत माझ्याबद्दल अपमानास्पद बोलली. परंतु यामागचा खरा सुत्रधार गणेश आचार्य आहे. इतका अपमान सहन करूनही मी जिवंत कशी, याचे मला आश्चर्य वाटते."
तनुश्रीने पाचही जणांना शाप देताना म्हटले की, "मी मनापासून, आत्म्यातून नाना पाटेकर, राखी सावंत, गणेश आचार्य, राकेश सारंग आणि सामी सिद्दीकीला शाप देते. माझा शाप केवळ या पाच जणांना लागणार नाही, तर त्यांच्या जवळच्या सर्व जणांना माझा शाप लागणार आहे. मी जो मानसिक आणि शारिरीक त्रास सहन केला आहे. तसा त्रास या पाच जणांना, त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही सहन करावा लागेल. कोणताही देव, शक्ती, पुजारी या लोकांना माझ्या शापापासून वाचवू शकणार नाही. परमेश्वर या लोकांना त्यांची शिक्षा देईल."
तनुश्री दत्ताचा 'या' पाच कलाकारांना शाप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jan 2019 01:38 PM (IST)
अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर छेडछाडीचा आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तनुश्रीने तिला त्रास देणाऱ्या कलाकारांना शाप दिला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -