Dancing On The Grave: काही दिवसांपूर्वी डान्सिंग ऑन द ग्रेव्ह (Dancing On The Grave) ही डॉक्युमेंट्री सीरीज प्रेक्षकांच्या भेटीस आली. आता या डॉक्युमेंट्री सीरीजवर बंदी घालण्याची मागणी मुरली मनोहर मिश्राच्या वकिलांनी केली आहे. डान्सिंग ऑन द ग्रेव्ह या डॉक्युमेंट्रीवर बंदी घालण्याची मागणी करत मुरली मनोहर मिश्रानं म्हटले आहे की, ही डॉक्युमेंट्री त्यांच्या कायदेशीर अधिकारांवर विपरित परिणाम करते. मुरली मनोहरला हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो सध्या मध्य प्रदेशातील सागर येथील मध्यवर्ती कारागृहात असल्याची माहिती आहे.
मुरली मनोहर मिश्राच्या वकिलाने इंडिया टुडे आणि प्राइम व्हिडिओला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटिसमध्ये म्हटलं आहे की, "ती वेब सिरीज (डान्सिंग ऑन द ग्रेव्ह) माझ्या क्लायंटशी संबंधित आहे, ज्यांचे प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. रिट याचिका क्र. 66 of 2014 नुसार तुमची ही वेब सिरीज कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे आणि न्यायाधीशासमोर प्रलंबित असलेल्या खटल्यातील माझ्या क्लायंटच्या कायदेशीर अधिकारांवर त्याचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे, मी तुम्हाला या कायदेशीर नोटीसद्वारे आवाहन करतो की, कृपया कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर तुमच्या वेब-सीरिजचा प्रसार थांबवावा.'
नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की, 'जर वेब-सीरिजचा प्रसार थांबण्यात आला नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, ज्यासाठी तुम्ही सर्व परिणामांसाठी पूर्णपणे जबाबदार असाल.' याशिवाय मुरली मनोहर यांच्या वकिलानेही या कायदेशीर कारवाईसाठी 55 हजार रुपयांची मागणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी 'डान्सिंग ऑन द ग्रेव्ह' या डॉक्युमेंट्री सीरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या ट्रेलरमध्ये 90 च्या दशकात शकीरा खलीलीची हत्या झाल्याचे दिसत आहे. शकीरा खलीलीचा पती स्वामी श्रद्धानंदने शकीराला जमिनीत गाडले. या हत्येने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती.
काय आहे प्रकरण?
1994 मध्ये, कर्नाटक पोलिसांना शकीरा खलीलीचा मृतदेह तिच्या घराखाली पुरलेला आढळला. शकीराला जेव्हा पुरले जात होते तेव्हाही ती जिवंत होती, असं म्हटलं गेलं. शकीराला जिवंत पुरल्यानंतर तिचा पती स्वामी श्रद्धानंदने त्याच ठिकाणी पार्टी केली होती, असंही म्हटलं जातं. डान्सिंग ऑन द ग्रेव्ह ही सीरिज प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: