मुंबई : अभिनेत्री कृतिका चौधरी हत्या प्रकरणाचं गूढ आता वाढत चाललं आहे. कृतिकाचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडल्यानं हत्येपूर्वी तिच्यावर जबरदस्ती झाली असावी, तसेच तिची हत्या 7 ते 8 जूनच्या दरम्यान झाली असावी, असा संशय वर्तवण्यात येतो आहे. या पार्श्वभूमीवर 7 आणि 8 तारखेच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
ज्या तरुणाशी तिचं शेवटचं बोलणं झालं होतं. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरु झाली आहे. कृतिकाच्या कॉल लिस्टमधील अनेक जण ड्रग्स घेत असल्याचं समोर आल्यानं याही पैलूचा तपास केला जातो आहे. हत्येप्रकरणी पोलिसांना पुरावा मिळाला असून, दोन दिवसात हत्येचा उलगडा होईल असा दावा पोलिसांकडून करण्यात येतो आहे.
कृतिका सिनेक्षेत्रात आपली स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. आपल्या ग्लॅमरस लूक आणि अभिनयाच्या जोरावर कृतिका यशाच्या पायऱ्या चढत होती. मात्र, एखादा मोठा ब्रेक मिळण्याआधीच मृत्यूने तिचे स्वप्न धुळीस मिळवले.
कृतिका मुंबईतील अंधेरीत भैरवनाथ सोसायटीत पाचव्या मजल्यावर राहत होती. अगदी हसत-खेळत जगणारी कृतिका अचानक गायब झाली. फ्लॅटही बंद होता. मात्र, ती बेपत्ता झाल्याच्या पाच-सहा दिवसांनंतर बंद फ्लॅटमधून वास येऊ लागला आणि शेजाऱ्यांना शंका आली. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर कृतिकाच्या हत्येची घटना समोर आली.
दरम्यान, पोलिसांनी दावा केला आहे की, दोन दिवसात कृतिकाच्या हत्येचा उलगडा होईल. त्यामुळे येत्या दोन दिवसात कृतिकाचा मारेकरी कोण आणि हत्येमागचं कारणं काय, हे जगासमोर येईल, हे नक्की.