नवी दिल्ली : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा मित्र आणि अभिनेता सिद्धार्थ पिठानी याला एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. यानंतर एनसीबीने आता सुशांत सिंह राजपूत याचे नोकर नीरज आणि केशव यांना चौकशीसाठी बोलावले आहे.
एनसीबीने म्हटलं की, सिद्धार्थ पिठानी यांच्या अटकेनंतर एनसीबीने नीरज व केशव यांना चौकशीसाठी बोलावले आहे. सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने नीरज आणि केशव यांना समन्स बजावले आहे.
अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचा 14 जून 2020 रोजी मृत्यू झाला. सुशांत हा त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. सुशांतच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देश हादरला होता. नंतर या प्रकरणात ड्रग्स अँगल देखील समोर आला. एनसीबीने अनेक बड्या सेलिब्रिटींना याबद्दल चौकशीसाठी बोलावले होते.
एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अनेकांना अटक देखील केली आहे. सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शॉविक चक्रवर्ती यांनाही ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. रिया मुंबईतील तुरूंगात जवळपास महिनाभर होती. रिया आणि शॉविक आता जामिनावर बाहेर आहेत.