Sushant Singh Rajput Death Anniversary :  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला आज चार वर्ष पूर्ण झाली आहेत.  सुशांत सिंह राजपूतने  14 जून 2020 रोजी राहत्या घरी आत्महत्या केली होती. सुशांतसारख्या कलाकाराने टोकाचा निर्णय घेतल्याने  बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली. सुशांतच्या स्मृतीदिनी त्याच्या चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर, अंकिता लोखंडे आणि सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीने खास पोस्ट लिहिली आहे. 


अंकिताची भावूक पोस्ट... 


सुशांत सिंग राजपूतच्या स्मृतीदिनी अभिनेत्री अंकिता लोखंडेने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टा स्टोरीवर सुशांतचा फोटो पोस्ट केला आहे. 'पवित्र रिश्ता'मध्ये अंकिता लोखंडेने 'अर्चना' नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती, तर सुशांत सिंह राजपूतने 'मानव'ची भूमिका साकारली होती. या शोमधून दोघांनाही खूप प्रसिद्धी मिळाली. अंकिता आणि सुशांत दोघेही जवळपास 6 वर्षे एकमेकांना डेट करत होते. 




सुशांतच्या बहिणीने शेअर केला जुना व्हिडीओ


सुशांतची बहीण श्वेताने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचा भाऊ सुशांतचा एक जुना  व्हिडिओ पहिल्यांदाच शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत त्याच्या बहिणींसोबत मस्ती करताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये श्वेताने एक पोस्ट लिहिली आहे. त्यात तिने म्हटले की, '' तू आम्हाला सोडून 4 वर्षे झाली आहेत आणि 14 जून 2020 रोजी काय झाले हे अद्याप आम्हाला माहित नाही. तुझा मृत्यू एक गूढ राहिला आहे. सत्यासाठी मी अधिकाऱ्यांना असंख्य वेळा आवाहन केले आहे.''






सुशांतची बहीण श्वेता सिंग कीर्तीने पुढे म्हटले की,  'मी माझा संयम गमावत आहे आणि आता मी हळूहळू हार मानत आहे. मला या प्रकरणात मदत करू शकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विचारायचे आहे. तुमच्या हृदयावर हात ठेवा आणि स्वतःला विचारा, सुशांतचे काय झाले हे जाणून घेण्याची आमची लायकी नाही का? हा राजकीय अजेंडा का बनला आहे? काय सापडले आणि त्या दिवशी काय घडले असे मानले जाते हे सांगण्याइतके सोपे का असू शकत नाही? मी भीक मागत आहे. आम्हाला एक कुटुंब समजा आणि आम्हाला पुढे जाण्यास मदत करा, असे श्वेताने म्हटले. 






 'खतरों के खिलाड़ी 14'फेम अभिषेक कुमारनेही सुशांत सिंह राजपूतला स्मृतीदिनी आदरांजली व्यक्त केली आहे. तुला आजही कोण विसरू शकलं आहे का, अशी पोस्ट त्याने लिहिली आहे. 






सुशांत सिंह राजपूतचे वयाच्या 34 व्या वर्षी निधन झाले. वांद्रे येथील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळला.  मुंबई पोलिसांनी सुशांतने आत्महत्या केली असल्याचे म्हटले. तर, त्याच्या कुटुंबीयांनी ही एक हत्या असल्याचे म्हटले. सुशांतच्या मृत्यूवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते.