मुंबई : ट्रॅजेडीकिंग दिलीप कुमार यांनी मुंबईतील पाली हिल भागातल्या संपत्ती प्रकरणी रिअल इस्टेट कंपनीला 20 कोटी रुपये द्यावेत, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. प्राजिता डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीसोबत दशकभरापूर्वी केलेल्या संपत्तीच्या सौद्याबाबत हे आदेश देण्यात आले आहेत.
दिलीप कुमार यांनी चार आठवड्यांमध्ये 20 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट तयार करुन जमा करावा, असं जस्टिस जे. चेलमेस्वर यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने सांगितलं. याबाबत बिल्डरच्या कंपनीला माहिती देण्यासही कोर्टाने सांगितलं.
रक्कम मिळाल्यानंतर आठवड्याभराच्या आत प्राजिता डेव्हलपरला वादग्रस्त प्लॉटवरुन त्यांची सुरक्षा हटवावी लागेल. मुंबई पोलिस आयुक्त आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपत्तीचा ताबा दिलीप कुमार यांना द्यावा लागेल. 20 कोटींपेक्षा अधिक रकमेची भरपाई देण्याच्या कंपनीच्या मागणीवर कोर्ट नंतर विचार करणार आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईतल्या वांद्र्यातील पाली हिल परिसरात ही 21 हजार 708 चौरस फूट जमीन आहे. प्राईम लोकेशनवरील या जागेवर बिल्डरने कोणतंही काम सुरु न केल्यामुळे दिलीप कुमार यांनी आक्षेप घेत जमीन परत मागितली. मात्र सध्या या जागेवर बिल्डरचा ताबा आहे.
दशकभरापासून हे प्रकरण कोर्टात सुरु आहे. बिल्डर आणि दिलीप कुमार यांच्यात झालेल्या करारानुसार त्या जागेवर बांधल्या गेलेल्या प्रत्येक फ्लॅटमध्ये मालक (दिलीप कुमार) आणि बिल्डर यांचा 50-50 टक्के वाटा असेल.