Sidhu Moose Wala:  पंजाबी गायक आणि रॅपर सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांची काही महिन्यांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमुळं संपूर्ण देश हादरला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. NIA ही तपास यंत्रणा देखील सिद्धू मूसेवाला खून प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, सिद्धू मूसेवाला यांची जवळची मैत्रीण आणि पंजाबी गायिका अफसाना खानची एनआयएनं चौकशी केली आहे.


अफसाना खानची पास तास कसून चौकशी 


पंजाबची प्रसिद्ध गायिका अफसाना खानमुळे आता सिद्धू मूसेवाला हत्याकांड प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. अफसाना खानला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) समन्स बजावले आहे. त्याअंतर्गत मंगळवारी (25 ऑक्टोबर) सिद्धू मूसेवाला प्रकरणाबाबत एनआयएनं अफसानाची सुमारे 5 तास कसून चौकशी केली. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, अफसाना खान ही सिद्धूची मानलेली बहीण होती.  अफसाना खानची आगामी काळात अधिक चौकशी होऊ शकते, असंही म्हटलं जात आहे. याशिवाय अफसाना खानचा बंबीहा गँगशी संबंध असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. 


कोण आहे अफसाना खान? 


सिद्धू मूसेवाला आणि अफसाना खान यांनी अनेक गाणी एकत्र गायली आहेत. वृत्तानुसार, सिद्धू मूसेवाला यांनी अफसाना खानला धमकीच्या फोन कॉल्सची कथित माहितीही दिली होती. इतकंच नाही तर सिद्धू मूसेवाला यांनी अफसाना खानसोबत 'जांदी वॉर' हे शेवटचं गाणंही गायलं होतं. मात्र, न्यायालयाने या गाण्यावर बंदी घातली आहे. अफसाना खान सुपरस्टार सलमान खानच्या प्रसिद्ध शो बिग बॉस 15 मध्ये दिसली होती.  व्हॉइस ऑफ पंजाब सीझन 3, राइजिंग स्टार-1  या कार्यक्रमांमध्ये  अफसाना खाननं सहभाग घेतला होता. लाला लोरी,धक्का, दिला हिम्मत कर या अफसानाच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.


सिद्धू मूसेवाला यांच्या अरदासच्या वेळी त्यांच्या वडिलांनी सिद्धूला गाण्यांच्या माध्यमातून कायम जिवंत ठेवणार असल्याचे सांगितले होते. सिद्धू यांचे वडील बलकौर सिंह म्हणाले होते की, ते दर 5-6 महिन्यांनी सिद्धू यांचे एक गाणे रिलीज करतील, जेणेकरून सिद्धूची सगळी गाणी पुढील 5-7 वर्षे रिलीज होत राहतील आणि ते लोकांच्या हृदयात कायम जिवंत राहतील. 29 मे 2022 रोजी संध्याकाळी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: