Shreyas Talpade on Heart Attack: मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेला (Shreyas Talpade) 14 डिसेंबर रोजी हार्ट अटॅक आला होता. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. श्रेयस आता रिकव्हर होत आहे. त्याला काही दिवसांपूर्वी डिस्चार्ज देखील मिळाले. श्रेयसने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये 14 डिसेंबर रोजी नेमकं काय घडलं? याबाबत सांगितलं.

  


श्रेयस म्हणाला, "जान है, तो जहान है"


टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये श्रेयसनं सांगितलं की, तो काही काळासाठी क्लिनिकली डेड झाला होता. तो म्हणाला," मला कधीच रुग्णालयात दाखल केले गेले नाही.साधं फ्रॅक्चर देखील मला कधी झालं नाही. मी हे सगळं पहिल्यांदाच अनुभवत होतो. तुमच्या आरोग्यला कधीही हलक्यात घेऊ नका कारण  जान है तो जहान है. मी वयाच्या 16 व्या वर्षी थिएटर करायला सुरुवात केली आणि वयाच्या 20 व्या वर्षी व्यावसायिक अभिनेता झालो. गेल्या 28 वर्षांपासून मी फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. आपण आपल्या कुटुंबाला गृहीत धरतो. आपल्याला वाटते की आपल्याकडे बराच वेळ आहे."


पुढे श्रेयसनं सांगितलं, "मी गेली अडीच वर्षे नॉनस्टॉप काम करत आहे. माझ्या चित्रपटांसाठी मी प्रवास करत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मला खूप थकवा जाणवत होता. मी जे करतो ते मला आवडते म्हणून मी ते करत राहतो. मी माझे बॉडी चेकअप देखील केलं.मी ECG, 2D इको, सोनोग्राफी आणि रक्त चाचण्या केल्या. माझे कोलेस्ट्रॉल खूप जास्त होते आणि मी त्यासाठी औषधे घेत होते. मला हृदयाच्या समस्यांचा कौटुंबिक इतिहास आहे. त्यामुळे मी खबरदारी घेत होतो."


शूटिंग करत असताना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला: श्रेयस तळपदे


श्रेयसनं शूटिंग दरम्यान त्याला झालेल्या त्रासाबद्दल सांगितलं. तो म्हणाला,  "वेलकम टू जंगलची शूटिंग करत असताना आम्ही पाण्यात उडी मारणे आणि इतर अॅक्टिव्हिटीची ट्रेनिंग घेत होतो. अचानक शेवटच्या शॉटनंतर मला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. माझा डावा हात देखील दुखू लागला. मी माझ्या व्हॅनिटीकडे गेलो आणि मी कपडे बदलले. मला वाटले की अ‍ॅक्शन सिक्वेन्समुळे माझे स्नायू दुखत आहेत. असा थकवा मला कधीच जाणवला नव्हता.घरी जाण्यासाठी मी गाडी बसलो त्यानंतर मला वाटलं की, मी सरळ दवाखान्यात जावे  पण आधी घरी जायला पाहिजे, असा विचार मी केला. माझी पत्नी दीप्तीने मला पाहिले. त्यानंतर 10 मिनिटांतच आम्ही हॉस्पिटलकडे निघालो. आम्ही हॉस्पिटलच्या गेटवर पोहोचलो पण प्रवेशद्वारावर बॅरिकेड असल्याने आम्हाला यू-टर्न घ्यावा लागला."


श्रेयस म्हणाला,"चेहरा सुन्न झाला अन् हृदयाचे ठोके काही मिनिटांसाठी थांबले"


पुढे श्रेयसनं सांगितलं "पुढच्याच सेकंदातच माझा चेहरा सुन्न झाला. हा हृदयविकाराचा झटका होता. माझ्या हृदयाचे ठोके काही मिनिटांसाठी थांबले. आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे गाडीच्या गेटमधून बाहेर पडणे शक्य नव्हते. काही लोकांना मदतीसाठी बोलावले. काही लोक मदतीला आले आणि मला आत घेऊन गेले. त्यानंतर डॉक्टरांनी सीपीआर आणि इलेक्ट्रिक शॉक दिला आणि त्यानंतर माझ्या हृदयाचे ठोके सुरु झाले."






संबंधित बातम्या


Shreyas Talpade: श्रेयस तळपदेला रुग्णालयातून डिस्चार्ज, 'त्या संध्याकाळी नेमकं काय घडलं?' पत्नी दीप्तीने सांगितलं