Amol Kolhe On Shivpratap Garudjhep : डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा 'शिवप्रताप गरुडझेप' (Shivpratap Garudjhep) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शिवप्रताप गरुडझेप' हा सिनेमा करताना उभ्या देशाचं लक्ष सिनेमाकडे वेधलं गेलं पाहिजे या जबाबदारीची जाणीव होती, असं 'शिवप्रताप गरुडझेप'च्या आठवणींना उजाळा देताना एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले," शिवप्रताप गरुडझेप' सिनेमात महाराजांची भूमिका साकारणं ही फार मोठी जबाबदारी होती. त्यापेक्षा ती जबाबदारी मला एका घटनेनं अधोरेखित केली. सिनेमाच्या प्री प्रोडक्शनदरम्यान विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं. त्यावेळी अनुराग ठाकूर माझ्यासोबत मराठी सिनेमा, सिनेसृष्टी याचा आवाका, व्याप्ती किती आहे यासंदर्भात चर्चा करत होते. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, आता खूप चांगले-चांगले सिनेमे बनत आहेत. मोठ्या बजेटचे सिनेमे आम्ही करत आहोत. प्रेक्षकदेखील भरभरुन प्रतिसाद देत आहेत. दरम्यान पार्लमेंटमध्ये बसलेला एक मित्र म्हणाला,तू पार्लमेंटमध्येदेखील अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतोस. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांना वंदनीय आहेत. पण एक गोष्ट मला कळत नाही. साध्या चंदनाच्या तस्करीवर आलेला सिनेमा एवढा मोठा होतो. खानमाफियांवर येणारा सिनेमा मोठा होतो. मग ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी महाराष्ट्राचचं नाही तर हिंदुस्तानचं आराध्यदैवत म्हणता. तर तो सिनेमा एवढा मोठा का होत नाही".
डॉ. अमोल कोल्हे पुढे म्हणाले,"मित्राने विचारलेला प्रश्न कुठेतरी मला टोचणारा होता. पण त्याचबरोबर एक जबाबदारी देणारा होता की मला तितका दिमाखदार सिनेमा करायचा आहे. महाराजांच्या स्वाभिमानाच्या स्फूलिंगांनं दिल्लीचे डोळे दिपले होते. त्याचपद्धतीने या घटनेचा जो सिनेमा आहे. या सिनेमानं उभ्या देशाचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. या जबाबदारीची जाणीव होती".
लाल किल्ल्यात शूटिंग करण्याबद्दल डॉ. अमोल कोल्हे म्हणाले,"आग्राच्या लाल किल्ल्यात चित्रीकरण करणं ही गोष्ट अवघड होती. आतापर्यंत एकही मराठी सिनेमा लाल किल्ल्यात शूट झालेला नाही. हिंदी सिनेमादेखील गेल्या वीस वर्षांपूर्वी शूट झालेला आहे. आणि नॉर्मल शूटिंगच्या जवळपास अडीचपट बजेट लाल किल्ल्यात शूटिंग करण्यासाठी लागणार होतं".
लाल किल्ल्यात शूटिंग करताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला?
लाल किल्ल्यात शूटिंग करताना डॉ. अमोल कोल्हे यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यासंदर्भात माहिती देत ते म्हणाले," शूटिंग दरम्यान उकाडा त्रासदायक होता. ऐन उन्हाळ्यात शूटिंग करताना रोज तीन-चार जण आजारी पडत होते. अगदी साधी टाचणी जरी विसरली तरी सेटपासून लाल किल्ल्यापर्यंत जावं लागत होतं. पण 356 वर्षांनंतर तो क्षण पुन्हा एकदा जगता येत आहे. पुन्हा एकदा ते पाहता येत आहे. सगळ्या विषम परिस्थितीमध्येदेखील सर्वांच्या मनात एक भावना होती ती म्हणजे, महाराजांसाठी मावळ्यांनी तर बलिदान दिलं. आपल्याला तर फक्त एवढे कष्ट घ्यावे लागत आहे. तर ते तेवढं करू".
लाल किल्ल्यात कोणते सीन शूट झाले आहेत?
औरंगजेबसंबंधी सर्व सीन, महाराजांचे लाल किल्ल्यात प्रवेश होताना, महाराज आणि औरंगजेब यांची भेट असे अनेक सीन लाल किल्ल्यात शूट झाले आहेत.
संबंधित बातम्या