Shipa Shetty's First Public Appearance : राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणानंतर शिल्पा शेट्टी आज पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आली आहे. शिल्पा शेट्टी तिची खास मैत्रिण आणि फॅशन डिझायनर नीतू रोहराच्या दुकानाचे उद्धाटन केले. तिच्या मैत्रिणीचे दुकान मुंबईतील खारमध्ये आहे. दुकानाचे उद्धाटन करताना शिल्पा लाल रंगाच्या वन पीस ड्रेसमध्ये दिसून आली. त्यानंतर शिल्पाने नीतू रोहराच्या दुकानातील अनेक ड्रेस घालून पाहिले. तसेच तिने नीतूच्या डिझाइनचे कौतुकदेखील केले.
राज कुंद्राच्या प्रकरणानंतर शिल्पा पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आली आहे. चेहऱ्यावर हसू ठेवत दुकानातील लोकांसोबत शिल्पाने संवाद साधला. शिल्पाने हसत खेळत तिच्या नेहमीच्या अंदाजात फोटो देखील काढले. पण या वेळी शिल्पाने मात्र मीडियासोबत संवाद साधण्याचे टाळले. शिल्पा शेट्टीने उद्धाटन केलेले दुकान शिल्पाच्या खास मैत्रिणीचे आहे. शिल्पा आणि नीतू रोहराचे मुले एकाच शाळेत शिक्षण घेतात.
काय आहे राज कुंद्रा प्रकरण
राज कुंद्राविरोधात सायबर गुन्हे शाखेनं गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात पोर्नोग्राफीच्या पहिल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यात अटकपूर्व जामीनासाठी राज कुंद्रानं मुंबई सत्र न्यायालयात जामानीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, तो अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्याला राज कुंद्रानं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. याप्रकरणी सर्व कागदपत्रं व माहिती तपास अधिकाऱ्यांना देण्यात आली असून सर्व साक्षीदारांचे जबाबही नोंदविण्यात आलेले आहेत. या तपासादरम्यान आपण पोलीस स्थानकांत जाऊन तपासात सहकार्यही केलेलं आहे. अशी माहिती राज कुंद्राच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आली.
फेब्रुवारी 2019 मध्ये 'आर्मप्राईम मीडिया प्राईव्हेट लिमिटेड' नामक कंपनीकडून आपल्याशी संपर्क साधला गेला होता. त्या अॅपमार्फत नवोदित प्रतिभावंत कलाकारांना त्यांचा अभिनय डिजिटल माध्यमातून दाखविण्याची संधी देण्यात येणार होती. त्यांची संकल्पना आवडली आणि व्यवसायिक म्हणून आपण त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचं कुंद्रानं आपल्या याचिकेत म्हटलेलं आहे. त्यानुसार फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 दरम्यान संबंधित कंपनीशी करार करण्यात आला होता. त्यादरम्यान आपला चित्रपट निर्मितीमध्ये जराही सक्रिय सहभाग नव्हता. तसेच हॉटशॉट्स अॅपमधील पोर्नोग्राफीशीही आपला काहीही संबंध नसून आपल्यावरील आरोप हे खोटे असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचा दावाही कुंद्रानं कोर्टापुढे केला.
आरोपपत्रात शिल्पा शेट्टीचाही जबाब?
या आरोपपत्रात राज कुंद्राची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीलाही साक्षीदार बनवण्यात आलेलं आहे. शिल्पाच्या जबाबानुसार, राज कुंद्रांनी 2015 मध्ये वियान इंडस्ट्री कंपनी सुरू केली, त्यांच्याकडे या कंपनीमध्ये 24.50 टक्के शेअर्स होते. या कंपनीमध्ये ती एप्रिल 2015 ते जुलै 2020 पर्यंत संचालक पदावर होती, त्यानंतर तिने वैयक्तिक कारणांमुळे हे पद सोडले. तसेच आपल्याला हॉटशॉट आणि बॉलीफेम बद्दल काहीही माहित नाही. मी माझ्या कामात व्यस्त असल्याने राज कुंद्रा काय करत होते हे आपल्याला माहित नसल्याचं शिल्पानं नमूद केले आहे.