Shilpa Navalkar : गेल्या काही दिवसांपूर्वी 'फक्त महिलांसाठी' या सिनेमाची घोषणा करण्यात आली. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून नवा वाद सुरू झाला आहे. शिल्पा नवलकरांनी (Shilpa Navalkar) 'फक्त महिलांसाठी' या सिनेमाच्या निर्मात्यावर 'सेल्फी' सिनेमाची कथा चोरी केल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 


शिल्पा नवलकरांनी लिहिलं आहे," 2015 साली मी लिहिलेलं 'सेल्फी' हे मराठी नाटक रंगभूमीवर आलं. ते हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये परितोष पेंटर या निर्मात्याने सादर केलं. त्यावेळेस निर्माता म्हणून मला त्याचा उत्तम अनुभव आला. त्याच वेळेस त्याने मला सांगितलं होतं की, त्याला 'सेल्फी' या नाटकावर चित्रपट करण्याची इच्छा आहे. पण मी त्याला म्हणाले की, हे नाटक कथेच्या गरजेनुसार एका बंद जागेत (स्टेशनवरची वेटिंग रूम) घडत असल्यामुळे हा फिल्मचा विषय नाही. 


त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी म्हणजे जून 2022 मध्ये मला पुन्हा परितोषचा फोन आला आणि मला भेटून त्याने मला सांगितलं की, त्याला पुन्हा एकदा ,सेल्फी, या नाटकावर सिनेमा करण्याची इच्छा आहे. मी पुन्हा तेच उत्तर दिलं. पण तो याच वर्षी 'सेल्फी' वरचा चित्रपट करण्याबद्दल ठाम होता. अखेर मी आनंदाने त्याला त्या चित्रपटाची पटकथा लिहिण्यास होकार दिला. मी त्याला सांगितलं की, आपल्याला नाटकाचा गाभा तोच ठेवून चित्रपटासाठी वेगळी कथा बांधावी लागेल. दिग्दर्शक म्हणून मृणाल कुलकर्णीची निवड झाली.



त्यांना मला परितोष पेंटर कडून एकही फोन आला नाही. आणि दोन दिवसांपूर्वी मला थेट परितोष पेंटर निर्मित मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित विराजस कुलकर्णी लिखित फक्त महिलांसाठी पीएमएस नावाची फिल्म अनाउन्स झालेली दिसली. 'सेल्फी' नाटकाचा मूळ गाभा हा आहे की पाच वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या महिला एका ट्रेन प्रवासासाठी भेटतात, एका अशा जागी अडकून पडतात जिथून त्यांना चटकन बाहेर पडता येत नाही आणि त्यानंतर त्यांचा एकत्र होणारा आंतरिक प्रवास. मृणालने काल दिलेल्या एका मुलाखतीत तिने चित्रपटाचा हाच गाभा सांगितला आहे, फक्त पाच ऐवजी चार बायका आहेत.. आणि अर्थातच प्रवासात घडलेल्या घटना वेगळ्या असतील,कारण त्या नाटकापेक्षा चित्रपटासाठी वेगळ्या कराव्याच लागतात.


शिल्पा नवलकरांनी पुढे लिहिलं आहे,"मी परितोष पेंटरशी या संदर्भात बोलले. त्याने अर्थातच मला सांगितलं की, आता कथा वेगळी असल्यामुळे मला पुढे काहीही कळवण्याची त्यांना गरज वाटली नाही. तो कामाच्या गडबडीत असल्यामुळे मला फोन करून कळवायचंही राहून गेलं की आता विराजसच ती फिल्म लिहिणार आहे. अर्थातच त्याने मूळ नाटकाच्या लेखकाला कुठल्याही प्रकारचे क्रेडिट देणं किंवा हक्क विकत घेण्याचा विचार केला नाही. आता कथा वेगळी असली तरीही हा चित्रपट माझ्याबरोबर सुरू केला होता. त्यामुळे तो 'सेल्फी' वरचाच आहे. याची मला पूर्ण कल्पना आहे. शिवाय ट्रेनच्या प्रवासात असणाऱ्या वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या स्त्रिया  व त्यांचा एकत्र प्रवास हा मूळ गाभा अजूनही तोच आहे". 


संबंधित बातम्या


Falguni Pathak : फाल्गुनी पाठक यांच्या दांडियाविरोधात हायकोर्टात याचिका; 21 सप्टेंबरला सुनावणीची शक्यता


Sonalee Kulkarni : अमृता खानविलकर आणि माझ्यात कोणतंही वैर नाही; सोनाली कुलकर्णीचा व्हिडीओ व्हायरल