मुंबई : नेटफ्लिक्सची वेबसीरिज 'दिल्ली क्राईम'ला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजसाठी सन्मानित करण्यात आलं आहे. बेस्ट ड्रामा सीरिजच्या श्रेणीत भारताच्या 'दिल्ली क्राईम'सह अर्जेंटिना, जर्मनी, यूके आणि अनेक आंतरराष्ट्रीय ड्रामांचा समावेश होता. यंदा कोरोना महामारीमुळे 48 वा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळा व्हर्चुअली आयोजित करण्यात आला होता. एमी अवॉर्ड मिळवणारी 'दिल्ली क्राईम' ही भारताची पहिलीच वेबसीरिज आहे.
'दिल्ली क्राईम' ही वेबसीरिज 2012 मधील दिल्लीच्या निर्भया प्रकरणावर आधारित होता. या प्रकरणाने संपूर्ण देश हादरुन गेला होता. दिल्लीमध्ये झालेल्या या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणावर वेब सीरिज बनली होती, जी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
दिल्ली पोलिसांनी ज्या तत्परतेने या प्रकरणाचा तपास केला आणि काही तासातच मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या हे या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. सोबतच या तपासात पोलिसांना आलेल्या अडचणीही मांडण्यात आल्या आहेत.
सात एपिसोडच्या या वेब सीरिजमध्ये शेफाली शाह यांनी पोलीस उपायुक्त वर्तिका चतुर्वेदी ही प्रमुख भूमिका साकारली होती. या सोबतच राजेश तेलंग, आदिल हुसैन, रसिका दुग्गल, गोपाल दत्त तिवारी, जया भट्टाचार्य, अभिलाषा सिंह, विनोद शारावत, मृदुल शर्मा, अनुराग अरोरा, सिद्धार्थ भारद्वाज या कलाकारांचा समावेश आहे. ऋषी मेहता या वेबसीरिजचे लेखक-दिग्दर्शक आहेत.
आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्डमध्ये भारतासाठी हे मोठं यश आहे. याआधी 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजसाठी 'सेक्रेड गेम्स सीझन वन'सह चार मोठ्या सीरिजना नामांकन मिळालं होतं, परंतु कोणालाही पुरस्कार मिळालेला नव्हता.
16 डिसेंबर 2012 रोजी घडलेल्या निर्भया प्रकरणारने दिल्लीसह संपूर्ण देश हादरला होता. दिल्ली क्राईम नावाने बनलेल्या या वेब सीरिजमध्ये निर्भया केसचाही उल्लेख आहे. या प्रकरणाचा तपास माजी पोलीस उपायुक्त (दक्षिण दिल्ली) छाया शर्मा करत होत्या.