Shatrughan Sinha On Non-Veg Ban: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते (Bollywood Actro) आणि तृणमूल काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी मांसाहाराबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, भारतात मांसाहारावर बंदी घालण्यात यावी. तसेच, देशात समान नागरी संहिता लागू करण्याबाबतही आपलं मत मांडलं आहे.
संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, "देशाच्या अनेक भागांत गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे. मला वाटतं की, देशात फक्त गोमांसच नाही तर सर्वसाधारणपणे मांसाहारी पदार्थांवरही बंदी घातली पाहिजे. दरम्यान, ईशान्येसह काही ठिकाणी, गोमांस खाणं अजूनही कायदेशीर आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "वाह खाओ तो यम्मी, पर हमारे नॉर्थ इंडिया में खाओ तो मम्मी."
शत्रुघ्न सिन्हा यांचा यूसीसीला पाठिंबा
शत्रुघ्न सिन्हा यांनी उत्तराखंडमध्ये यूसीसीच्या अंमलबजावणीबद्दल सांगिताना देशभरात त्याच्या अंमलबजावणीसाठी पाठिंबा दर्शविला आहे. ते म्हणाले की, "उत्तराखंडमध्ये यूसीसीची अंमलबजावणी कौतुकास्पद आहे. देशात यूसीसी निश्चितच लागू केलं पाहिजे आणि मला खात्री आहे की, सर्वजण माझ्याशी सहमत असतील. पण त्यात अनेक बारकावे आणि त्रुटी आहेत. म्हणूनच यूसीसी तरतुदींचा मसुदा तयार करण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे. या विषयावर प्रत्येकाचं मत जाणून घेण्यासाठी त्यांचा सल्ला घेतला पाहिजे."
सैफ अली खानवरच्या हल्ल्याबाबत काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा?
याआधी शत्रुघ्न सिन्हा यांनीही सैफ अली खानवरील हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर भली मोठी पोस्ट लिहिली होती. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलेलं की, "आपल्या लाडक्या सैफ अली खानवरील हल्ला खूप दुःखद आणि दुर्दैवी आहे. सैफ अली खानला खूप दुखापत झाली आहे. सुदैवानं, तो बरा होत आहे. माझे आवडते शो मॅन, चित्रपट निर्माते राज कपूर यांची नात, करिना कपूर खान आणि कुटुंबाला शुभेच्छा. याप्रकरणात सर्वांना विनंती आहे की, प्लीज कुणीच ब्लेम गेम खेळू नका. पोलीस त्यांचं काम करत आहेत."
पोस्टमध्ये, शत्रुघ्न सिन्हा यांनी पुढे लिहिलं की, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या चिंता आणि कामाचे मी कौतुक करतो. हे प्रकरण गुंतागुंतीचे करू नका. लवकरच हे प्रकरण सोडवलं जाईल. शेवटी, सैफ हा सर्वात हुशार स्टार्सपैकी एक आहे. तो पद्मश्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता देखील आहे. कायदा आपलं काम करेल. गोष्टी योग्य दिशेनं जात आहेत. लवकर बरा हो..."