मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख याचा 'मन्नत' हा बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हं आहेत. मन्नत बंगल्याच्या जागेच्या भाडेकरारातील अटी शर्थींचे उल्लंघन केल्याचा आरोप असून या प्रकरणी शाहरुखला कोट्यवधींचा दंड होण्याची शक्यता आहे.
मन्नत बंगल्याची जागा ही शासनाची असून ती भाडेकरारानं शाहरुखने राहायला घेतली होती. मात्र या भाडेकरारातल्या अटी शर्थींचं उल्लंघन झालं असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे शाहरुखकडून कोट्यवधी रुपयांचा दंड आकारला जाण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी अंधेरीतील तहसीलदार कार्यालय आणि एच वॉर्डचा अहवालही मागवण्यात आला आहे. दोन्ही अहवालांची तपासणी झाल्यावर पुढची कारवाई निश्चित होणार आहे. अटी शर्थींच्या झालेल्या भंगानुसार शाहरुख खानवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.
अनधिकृत रॅम्पसाठी दंड
यापूर्वीही शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर केलेलं बेकायदेशीर बांधकाम तोडण्यासाठी आलेला खर्च मुंबई महापालिकेने वसूल केला होता. शाहरुखकडून 1 लाख 93 हजार 784 रुपयांचा दंड पालिकेने वसूल केला होता. शाहरुखच्या मन्नत या बंगल्याबाहेर व्हॅनिटी वॅन पार्क करण्यासाठी त्याने रॅम्प बांधला होता.
या रॅम्पमुळे सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण होत असून चालताना तसेच वाहन चालवताना अडथळे येत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. या तक्रारीनंतर महापालिका आयुक्तांनी 6 फेब्रुवारी 2015 रोजी शाहरुखला नोटीस बजावली होती. नोटीस पिरीएड उलटून गेल्यानंतर 15 फेब्रुवारी 2015 रोजी एच के भाभा रोड आणि माऊण्ट मेरी रोडच्या जंक्शनवर असलेला हा रॅम्प पालिकेने तोडून टाकला होता.