मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या भेटीची इच्छा व्यक्त केलेल्या कर्करोगग्रस्त अरुणा पीके यांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी अरुणा यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांच्या मुलाने ट्विटरवरुन दिली. अरुणा यांच्या निधनाविषयी समजताच शाहरुखने ट्विटरवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि अरुणा यांच्या कुटुंबीयांचं सांत्वनही केलं. 'अल्ला तुम्हाला तुमच्या आईच्या मृत्यूचं दुःख सहन करण्याची शक्ती देवो. पालकांना गमावण्याचा त्रास मी समजू शकतो.  ती कायम तुमच्यासोबत असेल, हे ध्यानात ठेवा आणि स्वर्गातही तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल अशा गोष्टी करत रहा' असं शाहरुखने म्हटलं आहे. https://twitter.com/iamsrk/status/922726085606899714 अरुणा पीके यांचा मुलगा अक्षतने शाहरुखचे आभार मानले. आईच्या अखेरच्या क्षणांमध्ये तिला आनंद दिल्याबद्दल त्याने ऋण व्यक्त केले. https://twitter.com/akshatkhot/status/922685941415735296 अरुणा यांनी शाहरुख खानच्या भेटीची इच्छा व्यक्त केल्यानंतर एसआरकेने त्यांना व्हिडिओ मेसेज पाठवला होता. 'तुम्ही खूप खंबीर आहात. तुमची इच्छाशक्ती, तुमचा आनंद मला माहित आहे. या आजाराचा सामना करण्याची ताकद तुमच्यात आहे. तुमची ताकद आणि आमच्या प्रार्थनांनी तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल' असं किंग खान व्हिडिओमध्ये म्हणाला होता. डॉक्टरांच्या परवानगीने शाहरुखला अरुणा यांच्याशी फोनवर बोलण्याची इच्छा होती, मात्र ती इच्छा अपुरी राहिली.