Shah Rukh Khan Pathaan Success Story : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) कधीही न पाहिलेला अॅक्शन मोड, चार वर्षांनी लार्जर दॅन लाइफ हिरोचं रुपेरी पडद्यावर झालेलं जोरदार कमबॅक चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. तर दुसरीकडे 'बेशरम रंग' (Besharam Rang) या गाण्यातील दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) बिकीनीच्या रंगामुळे या सिनेमाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पण तरीही या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 


शाहरुखचं कमबॅक ते दीपिकाची बिकिनी...


शाहरुख खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर केलेलं कमबॅक ते दीपिकाची भगव्या रंगाची बिकिनी अशा अनेक कारणांनी 'पठाण' (Pathan) हा सिनेमा चर्चेत आहे. याच गोष्टींमुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला खरा. शाहरुखने या सिनेमाचं जास्त प्रमोशनदेखील केलं नाही. पण तरीही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. आज शाहरुखच्या चाहत्यासह प्रत्येक सिनेरसिक शाहरुखच्या 'पठाण'बद्दल भरभरुन बोलतोय. अनेक दिवसांनी प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळत आहेत. 


'पठाण' एक मसालापट!


'पठाण' सिनेमाचं देशभक्तीपर कथानक आणि अॅक्शनचा तडका तुमच्या पसंतीस उतरलं नाही तरी चालेल पण शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम अभिनीत 'पठाण' हा मसालापट खरोखरोच पाहण्याजोगा आहे.


Pathaan Review : शाहरुख खानचा 'पठाण' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...


प्रेक्षकांना सिनेमात गुंतवून ठेवणारे अनपेक्षित ट्विस्ट... 


सिद्धार्थ आनंदने 'पठाण' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. शाहरुखने या सिनेमात देशासाठी काही करण्यास तयार असणाऱ्या एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. वरवर साधी वाटणारी या सिनेमाची कथा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी आहे. सिनेमात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना सिनेमात गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. प्रेक्षकांनी रुपेरी पडद्यावर आतापर्यंत कधीही न पाहिलेली कथा या सिनेमाने दाखवली आहे आणि हेच या सिनेमाच्या यशाचं सर्वात मोठं कारण आहे. 


अॅक्शन आणि फाईट सीक्वेन्सची उत्कृष्ट बांधणी


'पठाण' सिनेमात शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमवर चित्रित करण्यात आलेले अॅक्शन आणि फाईट सीक्वेन्स पाहण्यासारखे आहेत. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचादेखील (Salman Khan) अॅक्शन सीक्वेन्स कमाल आहे. 'पठाण' या भव्यदिव्य सिनेमातील अॅक्शन सीक्वेन्स कल्पनेच्या पलीकडचे आहेत. हॉलिवूडच्या सिनेमाप्रमाणे या सिनेमाच्या अॅक्शन सीक्वेन्सची बांधणी करण्यात आली आहे. 


जमिनीपासून ते विमानापर्यंतच्या वेगवेगळ्या ठिकाणी अॅक्शन सीक्वेन्स आहेत. तसेच, वेगाने धावणारी ट्रेन, थंडीमुळे गोठलेले तलाव अशा अनेक गोष्टी 'पठाण'मध्ये दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टी पाहताना प्रेक्षकांना हसू अनावर होते. 


अविश्वसनीय आणि थरारक अॅक्शन सीक्वेन्स


हॉलिवूडच्या सिनेमांचे लोकप्रिय स्टंट दिग्दर्शक कॅसी ओ नील यांनी 'पठाण' सिनेमातील अविश्वसनीय आणि थरारक अॅक्शन सीक्वेन्स बसवले आहेत. उत्तम वीएफएक्स असल्यामुळे हे अॅक्शन सीक्वेन्स पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर शहारे येतात. सिनेमातील अॅक्शन सीक्वेन्स हेदेखील या सिनेमाचं यशाचं रहस्य आहे. 


'पठाण' या सिनेमातील थराथर अॅक्शन सीक्वेन्स बरोबर श्रीधर राघवन यांनी लिहिलेली या सिनेमाची पटकथा आणि अब्बास टायरवाला यांनी लिहिलेले संवाददेखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे आहेत. सिनेमातील अनपेक्षित ट्विस्ट आणि 'शिट्टी बजाओ' सारख्या डायलॉगमुळे हा सिनेमा प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला आहे. 


'या' कारणांमुळे 'पठाण' यशस्वी


शाहरुखच्या इमेजला धक्का न देता 'पठाण'ची निर्मिती करण्यात आली आहे. शाहरुखच्या विरोधात जॉन अब्राहमचा ताकदीचा अभिनय प्रेक्षकांना वेड लावतो. दीपिका पादुकोणचा एक वेगळा अंदाज या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. वेगळं कथानक, दर्जेदार संवाद, उत्तम संगीत आणि उत्कृष्ट दिग्दर्शक यासर्व गोष्टींमुळे 'पठाण' हा सिनेमा यशस्वी ठरला आहे. 


मसालापट आणि अॅक्शनपट बनवण्यात सिद्धार्थ आनंद उजवा


'पठाण'चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला 'तारा रम पम', 'सलाम नमस्ते' आणि 'अनजाना-अनजानी' सारख्या रोमॅंटिक सिनमाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यानंतर त्यांनी 'बॅंग बॅंग' आणि 'वॉर' सारख्या अॅक्शनपटांचं दिग्दर्शन करत अॅक्शन सिनेमांचा दिग्दर्शक म्हणून स्वत:ला सिद्ध केलं. चार वर्षांपूर्वी ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफला घेवून केलेला 'वॉर' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात यशस्वी ठरला. आता 'पठाण'च्या अभूतपूर्व यशाने त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की मसालापट आणि अॅक्शनपट बनवण्यात तो इतरांपेक्षा उजवा आहे. 


'बेशरम रंग' ते बॉयकॉटच्या धमक्या


'बेशरम रंग' या गाण्यावरुन सुरू झालेला वाद आणि बॉयकॉटच्या धमक्यांमुळे 'पठाण' या सिनेमाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात नेमका का अडकला आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात सिनेमा पाहण्यासाठी गेले. 'पठाण' हा मसालापट प्रेक्षकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. यासर्व कारणांमुळेच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Pathaan 2 : आता 'पठाण 2' चित्रपट धुमाकूळ घालणार..., 'पठाण'च्या यशानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदची घोषणा