Sarja: आतापर्यंत अनेक लव्हस्टोरींनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असलं तरी प्रत्येक लव्हस्टोरीत काही ना काही वेगळेपण पहायला मिळतंच. 'सर्जा' (Sarja) या आगामी मराठी चित्रपटातही रसिकांना म्युझिकल लव्हस्टोरी पहायला मिळणार आहे. ग्रामीण बाजाच्या या चित्रपटात रसिकांना प्रेमातील आजवर कधीही लाईमलाईटमध्ये न आलेले पैलू पहायला मिळतील. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे. कोणताही ओळखीचा चेहरा नसूनही रिलीज करण्यात आलेलं 'सर्जा'चं पोस्टर रसिकांची वाहवा मिळवण्यात यशस्वी ठरत आहे.
'सर्जा'ची निर्मिती अमित जयपाल पाटील यांनी केली असून, रमेश रंगराव लाड या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. 'सर्जा' या म्युझिकल लव्हस्टोरीचं दिग्दर्शन धनंजय मनोहर खंडागळे यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखनही खंडागळे यांनीच केलं आहे. पूर्णपणे ग्रामीण पार्श्वभूमी असलेली ही कथा खेडेगावात घडते. 'सर्जा'मध्ये मुख्य भूमिकेत मराठीतील कोणताही मोठा स्टार नसूनही रसिकांच्या मनात कुतूहल निर्माण करण्यात यशस्वी ठरत आहे. सोशल मीडियावर या पोस्टरचं प्रचंड कौतुक होत असल्याने, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
'सर्जा'बाबत दिग्दर्शक धनंजय खंडागळे म्हणाले की, हा एक खराखुरा वाटावा असा चित्रपट आहे. यातील प्रत्येक कॅरेक्टर पाहणाऱ्या प्रत्येकाशी कुठे ना कुठे रिलेट करेल. यात लव्हस्टोरीसोबत इतरही विविध पैलू हाताळण्यात आले आहेत. 'सर्जा'च्या रूपात मराठी रसिकांसमोर एक म्युझिकल लव्हस्टोरी सादर करण्याचं स्वप्न हर्षित-अभिराज यांच्या प्रयोगशील आणि सुमधूर संगीतामुळं शक्य झालं आहे. 'सर्जा'च्या रूपात प्रेक्षकांसमोर एक परिपूर्ण मनोरंजक सिनेमा सादर करण्याचा प्रयत्न आमच्या संपूर्ण टीमनं केला आहे.
'बबन' या संगीतप्रधान चित्रपटामुळे नावारूपाला आल्यानंतर सध्या 'रौंदळ' चित्रपटामुळे लाइमलाईटमध्ये असलेल्या संगीतकार हर्षित-अभिराज यांनी 'सर्जा'साठी सुमधूर संगीत दिलं आहे. हर्षित-अभिराज यांनीच पार्श्वसंगीतही दिलं आहे. या चित्रपटात अनिल नगरकर, रोहित चव्हाण, तुषार नागरगोजे, ऐश्वर्या भालेराव, आकाश पेटकर, ज्योति शेतसंधी, जगन्नाथ घाडगे, विष्णू केदार, प्रशांत पिसे, बालकलाकार गौरी खंडाळे, कुणाल गायकवाड आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. प्रशांत प्रल्हाद शिंदे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून राहुल मोतलिंग यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. सुबोध नारकर यांनी संकलन केलं असून कला दिग्दर्शन सुनील लोंढे यांचं आहे. 14 एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: