बॉलिवूड अभिनेता संजय (Sanjay dutta) दत्तची कारकीर्द जेवढी कौतुकास्पद तेवढीच टीकात्मकही राहिली आहे. एकीकडे संजय दत्तचा नवा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असून, अभिनेता रितेश देशमुखच्या राजा शिवाजी चित्रपटात त्याने अफलजखानाची भूमिका साकारली आहे. तर, दुसरीकडे काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या एका गाण्याबद्दल संजूबाबाला माफी मागावी लागली. संजय दत्तने राष्ट्रीय महिला आयोगासमोर उपस्थित राहून “सरके चुनर तेरी सरके” या गाण्यातील (Song) कथित अश्लीलता आणि महिलांचे अयोग्य चित्रण याबाबत माफी मागितली. आयोगाच्या अध्यक्षा (women) विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी झाली.
संजय दत्त यांनी महिला आयोगासमोर लेखी माफी सादर करताना, समाजाला अनवधानाने झालेल्या त्रासाबद्दल खेद व्यक्त केला आणि सर्जनशील माध्यमांमध्ये महिलांचे जबाबदारीने चित्रण करण्याचे महत्त्व मान्य केले. सुनावणीदरम्यान आयोगाने ज्ञान, हेतू आणि जबाबदारी यासंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले. अध्यक्षा यांनी विचारले की, अशा प्रकारच्या चित्रणात सहभागी होण्यापूर्वी कलाकाराने पुरेशी दक्षता घेतली होती का. तसेच वरिष्ठ आणि प्रभावशाली सार्वजनिक व्यक्तींनी त्यांच्या कामात कायदेशीर आणि सामाजिक मर्यादा पाळण्याची जबाबदारी अधोरेखित करण्यात आली. दरम्यान, या माफीनाम्यासह दुरुस्तीच्या उपाययोजनेत, संजय दत्त यांनी 50 आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली. भविष्यातील सर्व कलाकार करारांमध्ये (Artist Agreements) कायदेशीर तपासणी (legal due diligence) अनिवार्य करण्याचे आश्वासन संजय दत्तने आयोगाला दिले, जेणेकरून चित्रपट आणि इतर सर्जनशील प्रकल्पांमध्ये महिला व मुलांचे सन्मानजनक चित्रण सुनिश्चित होईल.
नोरा फतेहीने मागितली तारीख (Nora fatehi)
अभिनेत्री नोरा फतेही यांनाही आज आयोगासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले होते; मात्र त्या सध्या देशाबाहेर असल्याने उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांनी दुसरी तारीख देण्याची विनंती केली आहे. यापूर्वी, 6 एप्रिल रोजी समन्स बजावलेल्या इतर संबंधित व्यक्ती व संस्थांनी आयोगासमोर हजेरी लावून माफी सादर केली होती. त्यामध्ये दिग्दर्शक किरण कुमार उर्फ प्रेम, गीतकार रकीब आलम आणि केव्हीएन प्रोडक्शन कंपनीचे प्रतिनिधी गौतम के.एम. आणि सुप्रीथ यांचा समावेश होता.
गाण्यातील शब्द आणि स्टेप्सवर आक्षेप
“सरके चुनर तेरी सरके” गाण्यातील काही नृत्य स्टेप्सही वादाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. नोरा फतेही हिचे पदर अंगावरून खाली पाडणाऱ्या स्टेप्स आणि संजय दत्तचा हुक स्टेप यावर काही सोशल मीडिया युजर्सनी आक्षेप घेतला आहे. काहींनी तर गाण्यातील सादरीकरण ‘अतिशय भडक’ असल्याची टीका केली आहे. हे गाणं अर्जून जानया यांनी संगीतबद्ध केलं असून बोल रकीब आलम यांनी लिहिले आहेत.
