मुंबई : बॉलिवूडचा दबंग हिरो सलमान खान याच्या दबंग या चित्रपटांच्या सीरिजमधील तिसरा चित्रपट दबंग 3 नुकताच प्रदर्शित झाला आहे. दबंग 3 ने बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग मिळवली आहे. सलमान सध्या त्याच्याच आनंदात आहे. अशातच आता सलमानसाठी अजून एक आनंदाची बातमी आली आहे. WWE (World Wrestling Entertainment)ने सलमानला कस्टमाइज्ड डब्ल्यू डब्ल्यू ई चॅम्पियनशिप बेल्ट देऊन सन्मानित करणार असल्याची घोषणा केली आहे.


WWE च्या ट्विटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये सलमानला कस्टमाइज्ड डब्ल्यू डब्ल्यू ई चॅम्पियनशिप बेल्ट दिला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या बेल्टवर सलमानचे नावदेखील असणार आहे. व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, दबंग 3 चे यश साजरे करण्यासाठी आम्ही त्याला हा बेल्ट देत आहोत.





CAA विरोधी आंदोलनांचा दबंगला फटका


दरम्यान, सलमान खानसह सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर स्टारर सिनेमा दबंग-3 नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खानचा सिनेमा असल्याने या सिनेमाची जोरदार चर्चा होती. दबंग आणि दबंग-2 ला प्रेक्षकांनी चांगली पंसती दिली होती, त्यामुळे दबंग-3 ची सर्वांना उत्सुकता होती. मात्र सिनेमाला हवी तशी ओपनिंग मिळाली नसल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होत आहे. देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन सुरु असलेला गदारोळ या सर्वासाठी कारणीभूत असल्याचं दिसून येत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन सुरु असलेल्या आंदोलनाचा फटका दबंग -3 ला बसेल, असा अंदाज सिनेसृष्टीतील तज्ज्ञांनी आधीच वर्तवला होता.


दबंग-3 सिनेमाला 24.50 कोटींची ओपनिंग मिळाली आहे. दबंगच्या पहिल्या दोन सिनेमांपेक्षा ही ओपनिंग अधिक आहे, मात्र सर्वांचा यापेक्षा जास्त अपेक्षा होती. 2010 साली रिलीज झालेल्या दबंग सिनेमाला 14.50 कोटींची ओपनिंग मिळाली होती. त र 2012 साली आलेल्या दगंब-2 सिनेमाला 21.10 कोटींची ओपनिंग मिळाली होती. त्यामुळे दबंग-3 ला तुलनेने यापेक्षा चांगली ओपनिंग मिळेल, अशी सर्वांना आशा होती. मात्र तसं झालेलं दिसत नाही.








2019 मध्ये ओपनिंगला सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा


दबंग-3 रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला आहे. यामध्ये पहिल्या नंबरवर हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'स्टार' सिनेमा पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर सलमानचा भारत सिनेमा आहेत. तर तिसऱ्या स्थानावर मिशन मंगल आहे. वॉरने पहिल्याच दिवशी 53.35 कोटींची कमाई केली होती. भारतने 42.30 कोटींची कमाई केली होती. तर मिशन मंगलने 29.16 कोटींची कमाई केली होती.


दबंग सिनेमाचं बजेट जवळपास 100 कोटी रुपये आहे. या आठवड्यात सलमानच्या दबंग-3 ला टक्कर देण्यासाठी एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. मात्र पुढच्या आठवड्यात अक्षय कुमार, करिना कपूरचा गुड न्यूज सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे गुड न्यूज सिनेमाचा परिणाम दबंग-3 वर निश्चित पडू शकतो.