Sahil Khan : अभिनेता साहिल खान (Sahil Khan) सध्या चर्चेत आहे. महादेव बेटिंग अॅप प्रकरणी साहिल खानला आज मुंबई पोलिसांचे समन्स पाठवले आहे. मुंबई गुन्हे शाखेचे सायबर सेल याची चौकशी करणार आहेत. साहिल खान अद्याप चौकशीसाठी हजर झालेला नाही. तो येणार की नाही याची अजून खात्री नाही.
सोशल मीडियावर साहिल खान अॅक्टिव्ह
साहिल खानची एकीकडे चौकशी होणार असल्याचं समोर आलं आहे. पण चौकशीसाठी तो येणार की नाही याची अजून खात्री झालेली नाही. मात्र चौकशीच्या फेऱ्यात असणारा साहिल खान सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून ट्विस्टरवर त्याने काही फोटो शेअर केले आहेत.
'गुड मॉर्मंग जुमा मुबारक' असं म्हणत साहिलने ट्विट केलं आहे. अडचणीत असतानाही आपण कसे एन्जॉय करतोय हे सिद्ध करण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडून तो सध्या कुठे आहे याची माहिती घेतली जात आहे. साहिल खान महादेव बेटिंग अॅप प्रकरणात आरोपी असून सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
बेटिंग अॅप ऑपरेटर म्हणून साहिलचं नाव
माटुंगा पोलीस ठाण्यात खिलाडी ॲप संदर्भात झालेल्या गुन्ह्यात बॉलीवूड अभिनेता साहिल खानचा सहभाग होता. बेटिंग अॅप ऑपरेटर म्हणून एफआयआरमध्ये त्याचं नाव नोंदवण्यात आलं होतं. माटुंगा पोलिसांनी 31 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केलं होतं. यात अभिनेता साहिल खानचाही समावेश होता.
साहिल खानचे नाव एफआयआरमध्ये आरोपी क्रमांक 26 आहे. साहिल खानवर महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित आणखी एक बेटिंग अॅप चालवल्याचा आरोप आहे, तो म्हणजे साहिल खानवर केवळ प्रमोशनचाच नाही तर अॅप ऑपरेट करून प्रचंड नफा कमावल्याचा आरोप आहे. याआधी साहिल खान दुबईमध्ये ऑनलाइन बेटिंग अॅपच्या एका पार्टीच्या व्हिडिओमध्ये दिसला होता. त्यावेळी प्रमोशनल व्हिडीओ म्हणून त्याचे वर्णन करण्यात आले होते. आता एफआयआरमध्ये अॅप ऑपरेटर म्हणून नाव आल्याने साहिल खानच्या अडचणी वाढणार आहेत.
माटुंगा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीच्या आधारे माटुंगा पोलिसांनी महादेव बेटिंग अॅपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि शुभ सोनी यांच्यासह एकूण 31 हून अधिक जणांविरुद्ध फसवणूक आणि जुगाराच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकांची 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते बनकर यांनी केला आहे. माटुंगा पोलिसांनी साहिल खान, गौरव बर्मन, मोहित बर्मन आणि इतरांविरुद्ध आयपीसी कलम 420,465,467,468,471,120 (बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
संबंधित बातम्या